Supriya Sule on Vaishnavi Hagawane Case: पुण्यातील वैष्णवी कस्पटे – हगवणे या २३ वर्षीय महिलेने सासरच्या छळाला कंटाळून १६ मे रोजी आत्महत्या केली. मृत्यूप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून हगवणे कुटुंबातील सदस्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात पुन्हा एकदा हुंडामुक्तीसाठी चळवळ उभी करण्याची गरज व्यक्त केली होती.

शिकलेले लोकही चुकीचे वागत असून समाजात जागृती निर्माण करण्याची नव्याने आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी आता “हुंडामुक्त महाराष्ट्र – हिंसामुक्त कुटुंब, जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा”, या अभियानाची घोषणा केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत या अभियानाची माहिती दिली. २२ जून २०२५ पासून राज्यव्यापी अभियान राबविणार असल्याचे त्या म्हणाल्या. “महाराष्ट्राची लेक स्व. वैष्णवी कस्पटे – हगवणे हिचा अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी झाला ही घटना मनाला प्रचंड वेदना देणारी घटना आहे. ज्या राज्याने स्त्री-मुक्तीच्या दृष्टीने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले तेथे वैष्णवी सारख्या लेकीचा बळी जाणे हे अतिशय संतापजनक आहे. कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारे आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र आज सुन्न झाला आहे. त्यासाठी केवळ संताप आणि दुःख व्यक्त करून भागणार नाही तर जोरदारपणे कृतिशील जागृतीचे पाऊल उचलावे लागेल.”

त्यामुळेच येत्या २२ जून २०२५ पासून राज्यात हुंडाबळी व हिंसामुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारण्याचा निर्धार करतो आहोत”, असे सुप्रिया सुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या.

तीच खरी श्रद्धांजली ठरेल

समाजातील सर्व घटकांचा, सर्व यंत्रणांचा सहभाग यात घ्यावा लागेल. आणि त्या मोहिमेतूनच “हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचे” उद्दिष्ट सध्या करता येईल आणि वैष्णवीला तीच खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

या अभियानाविषयी माहिती देताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या टप्प्यात ही मोहीम राज्याच्या सर्व भागात राबविण्यात येईल. आणि यामोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळे याबाबतच्या तुमच्या सूचनांचे आणि आपल्या कृतिशील सहभागाचे आवाहन मी आपल्याला करत आहे. माझे सर्व भावा – बहिणींना नम्र आवाहन आहे की कृपया आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन “हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसाचार मुक्त कुटुंब” घडविण्यासाठी एकदिलाने काम करूया.”