राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्याने पंख छाटून अवमानित केले जात असल्याने कमालीचे अस्वस्थ झालेले पक्षाचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे पुढील राजकीय निर्णय न घेता ‘शांत’च आहेत. ही वादळापूर्वीची शांतता म्हणायची की अगतिकता आहे, हे समजत नाही. एकेकाळी राज्यात दबदबा निर्माण करणारे मोहिते-पाटील हे आता स्वत:च्या सोलापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणातही पार पिछाडीवर गेले आहेत. प्राप्त परिस्थितीत राजकीय निर्णय घेताना स्वत:चे अस्तित्व जपण्यासाठी त्यांना आपल्या गटाची फेरमांडणी करताना सर्वप्रथम स्वत:च्या कुटुंबाचे कवच सोडून बाहेर यावे लागणार आहे.
पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ मोहिते-पाटील घराण्याची सोलापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात चालत आलेली सद्दी आता संपुष्टात येत असताना उद्या स्वगृही-अकलूज परिसरातही संघर्ष करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही कशावरून, असा प्रश्नचिन्ह यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कारण विरोधकांचे प्रस्थ अकलूज-माळशिरसमध्ये वाढले आहे. ज्या राष्ट्रवादीत मोहिते-पाटील हे वावरत आहेत, त्या पक्षातूनच त्यांना उघडपणे योग्य सन्मानाची वागणूक न मिळता उलट, त्यांचे उरले-सुरले अस्तित्वही संपविण्याचा घाट घातला जात आहे. तरीही मान-अपमान सारे काही सहन करण्याची मानसिकता मोहिते-पाटील हे का बरे बाळगून आहेत, याचे कोडे काही उलगडत नाही. मात्र त्यामुळे हा गट आता केवळ नावापुरताच शिल्लक राहतो की काय, अशी परिस्थिती दिसून येते.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. या जन्मशताब्दी वर्षांतच मोहिते-पाटील गटाला आपले अस्तित्व सांभाळणे व त्यासाठी संघर्ष करण्याची सिद्धता ठेवणे हा योगायोग म्हणायचा का काळाचा महिमा? सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी आयुष्यभर कष्ट घेऊन सहकाराच्या माध्यमातून अकलूजच्या माळरानावर नंदनवन फुलविले. संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणावर वर्चस्व मिळविले. स्वत:च्या घराण्याचाही दबदबा वाढविला. त्यांचाच वारसा घेऊन वाटचाल करताना खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची आता पीछेहाट होत आहे. यात स्वत:चे कुटुंब सांभाळून ठेवता न येणे हे त्यांचे पहिले अपयश म्हणावे लागेल. मोहिते-पाटील घराण्यात कर्तेधर्ते म्हणून विजयसिंह यांना आपले दिवंगत कनिष्ठ बंधू प्रतापसिंह हे दुरावले गेले. राज्याच्या राजकारणात काही विशिष्ट तालेवार घराण्यांपैकी मोहिते-पाटील हे प्रसिद्ध घराणे मानले जाते. अर्थात, कोणत्याही घरात मतभेद होतात, त्यातून घर तुटते, त्याचा लाभ विरोधक उठवत असतात. मोहिते-पाटील घराणेही त्यास अपवाद ठरले नाही. मात्र सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षांत आपली विस्कटलेली घडी नीट बसविताना त्याबद्दलचे आत्मचिंतन करण्याची वेळ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर आली आहे. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी संघर्ष करीत उभा केलेला विकास व त्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ावर ठेवलेली मजबूत पकड याचा विचार करताना त्यात कुटुंबाला प्राधान्य देण्याची धारणा शंकरराव मोहिते-पाटील यांनी बाळगली नव्हती. त्यांचा वारसा चालविताना आता मोहिते-पाटील यांना गांभीर्याचे आणि तेवढेच सावधपणाचे राजकारण करणे गरजेचे बनले आहे.
स्थानिक राजकारणात मोहिते-पाटील यांनी घडविलेली व मोठी केलेली मंडळी आज त्यांचेच विरोधक म्हणून नाही तर पर्याय म्हणून पुढे आली आहेत. पवार काका-पुतण्यांची ताकद पाठीशी असल्याने मोहिते-पाटीलविरोधक सरस ठरत आहेत. २००९ सालची लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून मोहिते-पाटील यांना विरोध या एकाच महत्त्वाच्या मुद्दय़ावर पुढे आलेली मंडळी आज ‘गब्बर’ बनली आहेत. तर दुसरीकडे मोहिते-पाटील यांच्या गटातील अनेक लहान-मोठय़ा सहकाऱ्यांच्या निष्ठा पार गळून पडू लागल्या आहेत. आजच्या घडीला संपूर्ण जिल्ह्य़ात एकाही तालुक्यात जनाधार असलेला एकही अनुयायी त्यांच्याकडे राहिला नाही. जी मंडळी शिल्लक आहेत, ती एक तर राजकीयदृष्टय़ा शून्य किंमत असलेली किंवा हुजरेगिरी करणारी आहेत. त्याचा विचार करताना मोहिते-पाटील यांना डोळे उघडे ठेवून काम करताना स्वत:च्या गटाची फेरमांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही फेरमांडणी करताना त्यांना स्वत:च्या कुटुंबांचे कवच सोडण्याची गरज असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीप्रसंगी परिस्थितीचे भान ठेवून मोहिते-पाटील यांनी स्वत:च्या कुटुंबापेक्षा विरोधकाला अध्यक्षपद देण्याची व्यूहरचना केली गेली असती तर त्याचे परिणाम वेगळे पाहावयास मिळाले असते. यासंदर्भात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी आखून दिलेला आदर्श बराच बोलका आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर माढय़ाचे मोहिते-पाटील यांचे सध्याचे विरोधक असलेले आमदार बबनराव शिंदे यांचे वडील विठ्ठलराव शिंदे यांना सामावून घेण्याचा विषय आला होता. त्या वेळी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या सहकाऱ्यांपैकी दिंवगत ब्रह्मदेव माने, वि. गु, शिवदारे व इतर मंडळींनी विरोध केला. हा विरोध शंकरराव मोहिते यांना अर्थात रुचला नव्हता. त्यांनी आपल्या अस्तनीतले निखारे असलेल्या सहकाऱ्यांना शह देण्यासाठी स्वत:चे प्रमुख कट्टर विरोधक करमाळ्याचे नामदेव जगताप यांनाच बँकेचे अध्यक्ष केले होते. ही घटना सध्याच्या परिस्थितीत मोहिते-पाटील यांच्यासाठी पुरेशी शहाणपण देणारी ठरावी. त्यांच्यासाठी आता रात्रच नाही तर दिवसदेखील वैऱ्याचा ठरला आहे. मध्यंतरी मोहिते-पाटील यांच्या घरातील कोणी तरी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघाचे महत्त्व लक्षात घेता भाजपकडून मोहिते-पाटील यांच्या घरातील कोणाला तरी संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वर्चस्वाला तडा
मोहिते-पाटील हे राजकीयदृष्टय़ा जसे अडचणीत आहेत, तसेच सहकार क्षेत्रातही त्यांच्यापुढे कठोर आव्हाने उभी ठाकली आहेत. मोहिते-पाटील यांच्याशी संबंधित साखर कारखाने, शिक्षण संस्थेने घेतलेले सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज थकले आहे. ही रक्कम मोठी आहे. अकलूजमधील सुमित्रा सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी मिळेनाशा झाल्या आहेत. यामुळे मोहिते-पाटील यांच्यासमोर मोठी नामुष्की आली. याचाही त्यांच्या विरोधकांनी लाभ उठविला आहे.
- पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ मोहिते-पाटील घराण्याची सोलापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात चालत आलेली सद्दी आता संपुष्टात येत असताना उद्या स्वगृही-अकलूज परिसरातही संघर्ष करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही कशावरून, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कारण विरोधकांचे प्रस्थ अकलूज-माळशिरसमध्ये वाढले आहे. ज्या राष्ट्रवादीत मोहिते-पाटील हे वावरत आहेत, त्या पक्षातूनच त्यांना उघडपणे योग्य सन्मानाची वागणूक न मिळता उलट, त्यांचे उरलेसुरले अस्तित्वही संपविण्याचा घाट घातला जात आहे.
- स्थानिक राजकारणात मोहिते-पाटील यांनी घडविलेली व मोठी केलेली मंडळी आज त्यांचेच विरोधक म्हणून नाही तर पर्याय म्हणून पुढे आली आहेत. पवार काका-पुतण्यांची ताकद पाठीशी असल्याने मोहिते-पाटीलविरोधक सरस ठरत आहेत. २००९ सालची लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून मोहिते-पाटील यांना विरोध या एकाच महत्त्वाच्या मुद्दय़ावर पुढे आलेली मंडळी आज ‘गब्बर’ बनली आहेत.
कमालीचे अस्वस्थ झालेले पक्षाचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे पुढील राजकीय निर्णय न घेता ‘शांत’च आहेत. ही वादळापूर्वीची शांतता म्हणायची की अगतिकता आहे, हे समजत नाही.