रायगड जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख नद्या सध्या गाळाने भरल्या आहेत. पात्र उथळ झाल्याने नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा धोका संभावतो आहे. मात्र नद्यांचा गाळ काढण्याचा प्रस्ताव १९९५ पासून धूळ खात पडला आहे.
शासनाचे काम आणि १० वर्षे थांब अशी एक म्हण प्रचलित आहे. रायगड जिल्ह्य़ातील महाड, रोहा आणि नागोठणे गावच्या लोकांना सध्या याचाच प्रत्यय येतो आहे. कारण या शहरांना लागून असलेल्या नद्यांचा गाळ काढण्याचा प्रश्न गेली १८ वर्षे प्रलंबित राहिला आहे.
रायगड जिल्ह्य़ात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांवरून पाणी वेगाने खाली येते. डोंगर उतारावरून खाली येताना या पाण्यासोबत दगड गोटे वाहून आणले जातात. पावसाळ्यानंतर हे दगडगोटे नदीच्या पात्रात साचून राहतात. हा गाळ साचत गेल्याने कालांतराने नदीचे पात्र उथळ होत जातात. याचा परिणाम नदीकिनाऱ्यावरील गावांना भोगावा लागतो. थोडय़ा पावसातही नदीचे पाणी पुराच्या स्वरूपात गावात शिरायला सुरुवात करते.
रायगड जिल्ह्य़ातील काळ, सावित्री, गांधारी, कुंडलिका, आंबा या नद्यांना सध्या याच समस्येला तोंड द्यावे लागते आहे. जुलै २००५च्या प्रलयंकारी पावसानंतर रायगड जिल्ह्य़ातील सावित्री आणि कुंडलिका नद्यांचा गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तसा प्रस्तावही शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र आठ वर्षांनंतरही हा प्रस्ताव अजूनही शासनाच्या विचाराधीन आहे.    
महत्त्वाची बाब म्हणजे कोकणातील नद्यांचे गाळ समस्या लक्षात घेऊन, राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक ड्रेझर विकत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र हा ड्रेझर रायगड जिल्ह्य़ाला अद्यापही उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे राज्य सरकार या प्रश्नाबाबत किती गंभीर आहे. हे स्पष्ट झाले आहे.
    रायगड जिल्ह्य़ातील जांभूळपाडा गावाला १९८९ साली भीषण पुराचा तडाखा बसला होता. या पुरानंतर पूर येण्यामागील कारणांचा अभ्यास करण्यात आला. यातही सर्वेक्षणातही पूर येण्यामागे नदीचे उथळ पात्रच जबाबदार असल्याचे समोर आले. त्यानंतर नदीतील गाळ काढला गेला. गावालगतच्या परिसरात संरक्षक भिंत बांधण्यात आली. तेव्हा पासून जांभूळपाडा गावची समस्या कायमची दूर झाली. जिल्ह्य़ातील महाड, रोहा आणि नागोठणे शहरांसाठी हीच पद्धत अवलंबली तर शहरांना भेडसावणारी पूर समस्या कायमची निकाली निघू शकणार आहे. त्यामुळे नद्यांच्या पात्रातील गाळ काढणे गरजेचे आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गेल्या वर्षी रोह्य़ात आले असताना नद्यांच्या गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडून मशिनरी देण्याची ग्वाही दिली होती. मात्र वर्षभरानंतरही याची कोणतीच हालचाल झाली नाही. राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्य़ाचे रहिवासी आहेत. मात्र दुर्दैवाने त्यांनीही या कामाकडे लक्ष दिलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण गाळ काढण्याच्या कामांपेक्षा धरण बांधण्यावरच जलसंपदा विभागाचे लक्ष आहे.