गुहागर नगर पंचायतीच्या स्थापनेलाच आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने आता या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. गुहागर व असगोली या दोन ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात आणून गुहागर  नगर पंचायत स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला, तेव्हा या परिसरातील आणि विशेषत: असगोलीतील ग्रामस्थांनी त्या निर्णयाला कडाडून विरोध केला व न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. शासनाने नगर पंचायतीच्या स्थापनेबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. कारण त्या याचिकेवर सुनावणी करताना त्या वेळी न्यायालयाने स्थगिती दिली नव्हती.
दरम्यान, मूळ याचिकेवरील निर्णय पेंडिंग असतानाच शासनाने कायदेशीर तरतुदींचा अभ्यास केला आणि राज्य निवडणूक आयोगाने गुहागर नगर पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.
यानंतर मूळ याचिकाकर्त्यांनी आपल्या आधीच्या याचिकेच्या अनुषंगाने या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशा मागणीचा एक प्रस्ताव न्यायालयात सादर केला. हा प्रस्ताव २७ फेब्रुवारीला न्यायालयात दाखल केला. न्यायालयाने याबाबत सरकारचे म्हणणे मागविले. त्या वेळी सर्व त्या कायदेशीर बाबींच्या आधारानुसारच निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.
२६ मार्च रोजी या याचिकेवरील सुनावणी झाली आणि याचिकाकर्त्यांची निवडणूक प्रक्रियेला  स्थगिती देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे येत्या ३१ मार्चला होणाऱ्या गुहागर नगर पंचायतीच्या निवडणुकीतील अडथळा दूर झाला आहे.