बीड जिल्ह्यातील परळी शहरात २२ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने सोमवारी खळबळ उडाली होती. या घटनेचे गुढ उकलण्यात पोलिसांना काही तासातच यश आले आहे. बहिणीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून अल्पवयीन भावाने ही हत्या केल्याचे तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यात एक आरोपी अल्पवयीन आहे.

परळीतील गणेशपार भागातील अनिल हालगे या युवकाचा पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या मुस्लीम स्मशानभूमीजवळ सोमवारी मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासामध्ये या युवकाच्या मृतदेहावर हत्याराने हल्ला केल्याच्या खुणा आढळून आल्या होत्या. हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.

अल्पवयीन आरोपीच्या बहिणीशी मयत युवकाचे प्रेम संबंध होते. त्याच रागातून आरोपीने अनिलची हत्या केली. विशेष म्हणजे आरोपींनी ब्लेडने हल्ला करून अनिलची हत्या केल्याचे चौकशीतून समोर आले. पोलिसांनी दम देताच आरोपींनी हत्येसाठी वापलेले ब्लेड, दगड आणि मयत अनिलचा तुकडे केलेला मोबाईल पोलिसांच्या हवाली केला. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.