scorecardresearch

वृध्देवर लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास जन्मठेपेसह १५ वर्षे सक्तमजुरी

अक्कलकोट तालुक्यात एका ७५ वर्षांच्या वृध्देवर अमानुष लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल ४८ वर्षांच्या नराधमाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि लैंगिक अत्याचाराबद्दल १५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात एका ७५ वर्षांच्या वृध्देवर अमानुष लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल ४८ वर्षांच्या नराधमाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि लैंगिक अत्याचाराबद्दल १५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. मल्लप्पा बसवंत बनसोडे (रा. उडगी, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी या खटल्याचा निकाल दिला. हा खटला दुर्मिळात दुर्मीळ असल्याचा दावा करीत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी केली होती. परंतु न्यायालयाने ती मान्य केली नाही.

मृत वृध्द महिला आपल्या पतीसोबत १९ जानेवारी २०१९ रोजी जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेली होती. नंतर ती अचानक गायब झाली. पती एकटाच गावाकडे परतला. त्यामुळे मुलाने वृध्द आईचा शोध सुरू केला असता अक्कलकोट स्टेशन ते तोळणूर रस्त्यावर कडबगाव शिवारात वृध्द महिला मृतावस्थेत आढळून आली. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू झाला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानुसार मृत वृध्द महिलेवर लैंगिक अत्याचार होऊन नंतर तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.

तपासात मृत वृध्द महिलेसोबत एका व्यक्तीला पाहणारे मल्लिनाथ करपे यांनी पोलिसांसमोर जबाब दिला असता संबंधित व्यक्तीच्या वर्णनानुसार पोलिसांनी संशयित म्हणून आरोपी मल्लप्पा बनसोडे यास मैंदर्गी येथे ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या कबुली जबाबानुसार त्याने मृत वृध्द महिलेवर लैंगिक अत्याचार केले. यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे वृध्देचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी १५ साक्षीदार तपासले. यात न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा आणि शवविच्छेदनाचा अहवाल महत्त्वाचा ठरला. आरोपीतर्फे अ‍ॅड. ए. डी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder sexual assault elderly labor life imprisonment ysh

ताज्या बातम्या