ब्दप्रधान गायकीचे पुरस्कर्ते आणि आपल्या अवीट चालींनी अनेक गीतांना रसिकांच्या हृदयामध्ये स्थान देणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना यंदाचा ‘गदिमा’ पुरस्कार जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर, प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेला ‘चैत्रबन’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
अपघात झालेल्या पतीची वैद्यकीय उपचारांसह सेवा करणाऱ्या आधुनिक सावित्री आणि ‘शून्यातून सूर्याकडे’ या आत्मकथनपर लेखन करणाऱ्या डॉ. आरती दातार यांना विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार जाहीर झाला आहे. ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री राम नाईक यांना ‘गदिमा स्नेहबंध’ पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गदिमांच्या ३५व्या स्मृतिदिनानिमित्त १४ डिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात फिल्म सिटीचे कार्यकारी संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त श्रीधर माडगूळकर आणि आनंद माडगूळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शालान्त परीक्षेत मराठी विषयात ९८ गुण प्राप्त करणाऱ्या श्री देशी केंद्र हायस्कूलची मिताली मििलद कुलकर्णी या विद्यार्थिनीला ‘गदिमा’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात उत्कर्ष प्रकाशनतर्फे श्रीधर माडगूळकर यांच्या ‘मंतरलेल्या आठवणी’ या पुस्तकाच्या दुसऱ्या, तर विद्याताई माडगूळकर यांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. उत्तरार्धात अरुण काकतकर हे गदिमांच्या साहित्यावर आधारित दुर्मिळ चित्रफितींचे संकलन असलेला ‘शब्दानन’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.     
यंदापासून ‘विद्या प्रज्ञा’ पुरस्कार
गदिमा प्रतिष्ठानतर्फे यंदापासून विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘विद्या प्रज्ञा’ हा पुरस्कार नव्याने सुरू करण्यात आला आहे. विद्याताई या गायिका होत्या. सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले पहिले ध्वनिमुद्रित हे विद्याताईंनीच गायले होते.
मात्र, विवाहानंतर त्यांची गाण्यातील कारकीर्द थांबली. नव्या उभारीच्या प्रतिभावंत कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून, युवा गायिका मधुरा दातार यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.