शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी धारावी येथे बोलत असताना मुस्लीम समाजाच्या पाठिंब्याबाबत एक विधान केलं. त्यांच्या विधानाची आज संजय राऊत यांनीही री ओढली. उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुस्लीम समाजाचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे. मी त्यांना सांगतो की, तुम्हाला माहीत नाही का? मी कोण आहे. मी शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राटांचा मुलगा आहे. मी स्वतःला प्रखर हिंदुत्ववादी म्हणवतो, तरीही तुम्ही मला का पाठिंबा देत आहात? यानंतर मुस्लीम समाजाच्या लोकांनीच मला आमच्या आणि भाजपामधील हिंदुत्वामधला फरक समजावून सांगितला.” उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनीही भाजपावर टीका करताना आम्ही भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही, असे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मुस्लीम समाजाचे लोक आमच्या आणि भाजपामधील हिंदुत्वामधला फरक सांगतात. आमचे हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे आहे, तर भाजपाचे हिंदुत्व घर पेटवणारे आहे.” प्रभू श्रीराम आमच्या हृदयात असून आमचे हिंदुत्व राष्ट्राभिमानी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“दाढीने काडी केली तर तुमची लंका जळेल”, शिंदेंच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले “रावणाला…”

हिंदूंचा पाकिस्तान किंवा इराण होऊ देणार नाही

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची री संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत ओढली. ते म्हणाले, “या देशातील ख्रिश्चन असो किंवा मुस्लीम असो… इतर धर्मीयांना घाबरवले जात आहे. हिंदू आणि इतर धर्मीय समाजामध्ये दरी निर्माण केली जात आहे. यामुळे देशाला धोका असून देशाचे तुकडे होऊ शकतात. देशातील आणि खासकरून महाराष्ट्रातील सामान्य मुसलमान आमच्याबरोबर आहे. कारण आमच्या हिंदुत्वाची व्याख्या उद्धव ठाकरे यांनी सांगितली, त्याप्रमाणे आहे. देशभरात आता मानवतेच्या आधारावर रोजगार मिळाला पाहीजे, राम नावासह कामही मिळाले पाहीजे. आम्ही भारताचा हिंदू पाकिस्तान किंवा इराण होऊ देणार नाही.”

मोदींच्या मनात येईल त्याला भारतरत्न

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल भाजपा सरकारवर टीका केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील एका वर्गाची मते मिळविण्यासाठीच पंतप्रधान मोदी यांनी कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला होता. भारतरत्न देण्यासंदर्भात याआधी काही संकेत पाळले जात असत. किती भारतरत्न पुरस्कार दिले जावेत आणि ते कुणाला दिले जावेत? याचे संकेत आता मोडले जात असून पंतप्रधान मोदी यांच्या मनाला वाटेल तसे भारतरत्न पुरस्कार दिले जात आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.