म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन आज (२२ डिसेंबर) येथील थिबा राजवाडय़ाला भेट देण्यासाठी रत्नागिरीत येत आहेत. एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाने रत्नागिरीला भेट देण्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग आहे. सकाळी नऊ वाजता यू थेन सेन यांचे येथील विमानतळावर आगमन होणार असून, प्रथम ते शिवाजीनगर भागातील थिबा राजाच्या समाधीला भेट देणार आहेत. त्यानंतर राजवाडय़ाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. सुमारे दोन तासांच्या या दौऱ्यासाठी शहरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
पूर्वीच्या ब्रह्मदेशचा राजा असलेला थिबा याला तत्कालीन ब्रिटिश सरकारने १८८५ मध्ये लढाईत पराभूत केले आणि कैद करून चेन्नईमार्गे रत्नागिरीत आणून ठेवले. येथे सुरुवातीच्या काळात कुटुंबासह राहण्यासाठी त्याला दिलेले निवासस्थान अपुरे पडू लागल्यामुळे १९१० मध्ये सध्याचा राजवाडा बांधण्यात आला, पण त्या ठिकाणी थिबा राजा जेमतेम सहा वष्रे राहिला. १९१६ मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या पत्नी व मुलींना पुन्हा तत्कालीन ब्रह्मदेशात पाठविण्यात आले आणि ब्रिटिश सरकारने या राजवाडय़ाचा ताबा घेतला. स्वातंत्र्योत्तर काळात त्याची देखभाल करण्याचे फारसे नियोजनबद्ध प्रयत्न झाले नाहीत. मात्र मुंबई विद्यापीठाचे केंद्र, आयटीआय, सरकारी कार्यालये इत्यादीसाठी राजवाडय़ाचा काही भाग वापरण्यात आला.
मृत्यूसमयी थिबाराजाजवळ फारशी धनदौलत किंवा मौल्यवान वस्तू नव्हत्या. त्यामुळे या राजवाडय़ात त्या काळातील काही लाकडी सामान वगळता बाकी दालने रिकामीच आहेत. त्या ठिकाणी राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे कार्यालय असून उरलेल्या भागात वस्तुसंग्रहालय करण्यात आले आहे. येथील आर्ट सर्कल या संस्थेने गेल्या पाच वर्षांपासून राजवाडय़ाच्या प्रांगणात संगीत-कला महोत्सव सुरू केला. तेव्हापासून या परिसरात रत्नागिरीकरांची पुन्हा वर्दळ वाढली आहे. तसेच राजवाडय़ाची डागडुजीही करण्यात आली आहे, पण त्यामध्ये आणखी दीर्घकालीन उपायांची गरज आहे.
राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन यांच्या उद्याच्या भेटीत याबाबत पाहणी व चर्चा होईल आणि म्यानमारच्या वतीने ठोस सहकार्य केले जाईल, अशी अपेक्षा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2012 रोजी प्रकाशित
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष आज रत्नागिरीत
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन आज (२२ डिसेंबर) येथील थिबा राजवाडय़ाला भेट देण्यासाठी रत्नागिरीत येत आहेत. एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाने रत्नागिरीला भेट देण्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग आहे. सकाळी नऊ वाजता यू थेन सेन यांचे येथील विमानतळावर आगमन होणार असून,

First published on: 22-12-2012 at 03:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myanmar president today in ratnagiri