नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या महाराष्ट्र युनिटतर्फे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. ९ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता शालिमार येथील आय.एम.ए. सभागृहात आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
याबाबतची माहिती मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी दिली. संस्थेतर्फे प्राध्यापक, शिक्षक आणि १०वी, १२ वी परीक्षेत तसेच विद्यापीठात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व  अंध प्रवर्गासाठी कार्यरत असलेली संस्था यांना आदर्श प्राध्यापक, शिक्षक व गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श संस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा पुरस्काराचे १५ वे वर्ष  आहे. सोहळ्याचे अध्यक्षस्थान रामेश्वर कलंत्री भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. पांढरीपांडे उपस्थित राहणार आहे. आदर्श प्राध्यापक पुरस्कारासाठी कोल्हापूर येथील श्री शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. अंजली निगवेकर, आदर्श शिक्षक पुरस्काराने कोल्हापूर येथील ज्ञानप्रबोधन भवन संचलित अंधशाळेतील गौतम कांबळे, लातूरस्थित अंध मुलांचे निवासी विद्यालयाचे दिलीप ढगे, नागपूर येथील ब्लाइंड बॉईज इन्स्टिटय़ूटच्या जयश्री पाठक यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आदर्श संस्था म्हणून अहमदनगर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, सुवर्ण महोत्सवपूर्ती विशेष पुरस्कारित संस्था म्हणून नाशिकरोड येथील शासकीय अंधशाळेला गौरविण्यात येणार आहे. विद्यापीठ स्तरावर कोल्हापूर येथील रामचंद्र मगदूम, सोलापूर येथील सागर कचरे, मुंबई येथील सुरभी साचर, ऋषभ कापसी, नाशिक येथील मटिल्डा डाबरे, नीलेश गायकवाड यांना गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरविण्यात येईल.
उच्च माध्यमिक गटात औरंगाबादची गोदावरी मगर, माधुरी सोनवणे, नाशिक येथील सविता निकम, चंद्रपूर येथील सुषमा दुधे, नागपूर येथील राहुल बजाज, मुलुंड येथील अंकिता राजे, ठाणे येथील श्रीकांत नायक, अमरावती येथील देवेश साखरे, यवतमाळ येथील अभिनया अय्यर, कोल्हापूर येथील पूजा गुरव, कोल्हापूर येथील बाळकृष्ण जोशी, नांदेड येथील अनुराधा थडगे, उस्मानाबाद येथील प्रवीण जावळे यांना सन्मानित करण्यात येईल. माध्यमिक स्तरावर औरंगाबाद येथील सोहम पटणी, बीड येथील संकेता भुले, जळगाव येथील नेहा जैन, नागपूर येथील भक्ती घोटाळे, मुंबई येथील मीत व्यास, अमरावती येथील गौरव अग्रवाल आणि सातारा येथील चैतन्य पुजारी यांना सन्मानित करण्यात येईल.