मध्यप्रदेशातील १५ वर्षीय मुलीस शेजारी राहणाऱ्या युवकाने आपल्या वासनेचा बळी ठरविले. ती मुलगी सात महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तक्रारीवरून अजनी पोलिसांनी युवकाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. श्रवण कोडापे (२१) रा. मंडला-मध्यप्रदेश असे आरोपीचे नाव आहे.

पीडित १५ वर्षाची मुलगी आणि आरोपी श्रवण कोडापे मंडला गावाता एकाच परिसरात राहतात. श्रवण हा मंडला येथेच एक वीटभट्टीत कामाला आहे. जवळपास वर्षभरापूर्वी श्रवणने पीडितेशी ओळखी वाढवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लग्नाचे वचन देऊन तिचे लैंगिक शोषण करू लागला. या दरम्यान पीडिता गर्भवती झाली. तिने श्रवणला याबाबत सांगितले, मात्र त्याने हात वर केले. पीडिता उपचारासाठी नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात आली. वैद्यकीय तपासणीत ती ७ महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. डॉक्टरांनी तिचे वय विचारले असता १५ वर्षांची असल्याचे समजले. डॉक्टरने अजनी पोलिसांना सूचना दिली. अजनी पोलिस रुग्णालयात पोहोचले. पीडितेची जबानी नोंदवून घेतली. घटनास्थळ मंडला असल्याने हे प्रकरण आता मंडला पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे.