नागपूरमधील पोलीस एका वेगळ्याच पेचात सापडले होते जेव्हा एक तरुण त्यांच्याकडे अजब तक्रार घेऊन आला. आपले हृदय चोरीला गेले असून त्याचा शोध घ्यावा, अशी तक्रार या तरुणाने पोलिसांत दाखल केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही बाब सांगितली आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, एका मुलीने आपले हृदय चोरले असून त्याचा शोध घेण्यात यावा अशा मागणीची तक्रार या तरुणाने पोलिसांमध्ये दिली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी आजवर वस्तू चोरल्याच्या तक्रारी नोंदवून घेतल्या आहेत. मात्र, हृदय चोरीला गेल्याची अशी विचित्र तक्रार त्यांच्याकडे पहिल्यांदाच आल्याने त्यांचीही चांगलीच भंबेरी उडाली. तक्रार लिहून घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला याबाबत काय तक्रार लिहून घ्यायची हे कळेनासे झाल्याने त्याने थेट आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधला आणि हे प्रकरण कसे हाताळावे याचे मार्गदर्शन घेतले.

वरिष्ठांशी बोलणे झाल्यानंतर त्या पोलिसाने सांगितले की, भारतीय कायद्यांमध्ये अशा स्वरुपाच्या तक्रारींसाठी कोणतेही कलम नाही. शेवटी संबंधीत पोलीस कर्मचाऱ्याने त्या तरुणाला समजावून सांगितले की, आपल्याकडे यावर काहीच उपाय नाही.

हा अनपेक्षित प्रकार नागपूरचे पोलीस आयुक्त भुषणकुमार उपाध्याय यांनी गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात सांगितला. या कार्यक्रमात नागपूर पोलिसांकडून चोरीचा माल जप्त करुन तो ज्याच्या मालकिचा आहे, त्याच्याकडे सुपूर्द करत होते. यावेळी सुमारे ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्या मालकांकडे सोपवला. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आयुक्त उपाध्याय यांनी हास्यमुद्रेने सांगितले की, आम्ही चोरीच्या वस्तू परत करु शकतो मात्र, काहीवेळा आमच्याकडे अशाही तक्रारी येतात. ज्या आम्ही सोडवू शकत नाही.