नागपूर महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. पूर्व नागपुरातून चतुर्वेदी पाचवेळा विधानसभेवर निवडून आले होते.

नागपूर महापालिका निवडणुकीत सतीश चतुर्वेदी यांनी काँग्रेसविरोधातील बंडखोर उमेदवारांचा उघडपणे प्रचार केला होता. बंडखोरांनी निवडणूक लढवावी, यासाठी चतुर्वेदींनी प्रोत्साहन दिले होते. यासंदर्भात काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी देखील गेल्या होत्या. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनीही आपला अहवाल पक्षाकडे दिला होता. याबाबत सतीश चतुर्वेदी यांना नोटीसही बजावण्यात आली. मात्र, त्यावर चतुर्वेदींनी उत्तर दिले नव्हते.

शुक्रवारी पक्षाने चतुर्वेदी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. ‘महापालिका निवडणुकीत बंडखोर उमेदवारांना उभे राहण्यास प्रोत्साहन देऊन त्यांचा प्रचार केला. तसेच काँग्रेस उमेदवारांचा पराभव करण्यास चतुर्वेदी कारणीभूत ठरल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले. पक्षशिस्तीचा भंग करुन पक्षाचे नुकसान केल्यामुळे चतुर्वेदी यांना पक्षातून काढून टाकल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात प्रदेश काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी हलक्या स्वरात बोलताना सोनिया गांधी यांच्या मिरवणुकीसाठी कोटय़वधी रुपयांचा निधी गोळा केल्याचे चतुर्वेदींचे वक्तव्य एका वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले होते. या ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे चतुर्वेदी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.