बीड : अवैध वाळू वाहतूक करताना जप्त केलेला टिप्पर सोडण्यासाठी म्हणून मागितलेले एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे याच्यासह एका मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा रचून रंगेहात पकडले. गेवराई तहसील कार्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली.

गेवराई तहसीलमधील नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर बुधवारी सकाळी तहसील परिसरातच सापळा लावण्यात आला. या वेळी लाच स्वीकारताना नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे व मध्यस्थ खासगी व्यक्ती माजीद शेख याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बीड जिल्ह्यतील गेवराई, माजलगाव या तालुक्यातून गोदावरी नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो. या तालुका तहसील कार्यालयामध्ये नियुक्ती मिळवण्यासाठी तहसीलदारापासून शिपायापर्यंत अनेक जण धडपडत असतात. वाळू धंद्यातील खाबुगिरी वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने उघड होत आहे.