सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. मराठी वृत्तपत्र ‘लोकमत’ने ही मुलाखत आयोजित केली होती. या मुलाखतीत देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. नाना पाटेकर यांनी राज्यातील कृषी, समाजकारण, राजकारणावर शिंदे आणि फडणवीस यांना बोलतं केलं. दरम्यान, या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी राजकीय नेत्यांच्या वृत्तीवर बोट ठेवत ‘तुम्ही लोकसेवक आहात, राज्यकर्ते नव्हे,’ असे विधान केले. त्यांच्या या विधानवर एकनाथ शिंदे यांनीदेखील चपखल भाष्य केले.
हेही वाचा >> “एवढा उजेड आहे, आता मशाल कशाला? लोकांना..,” उद्धव ठाकरे गटाच्या नव्या निवडणूक चिन्हावरून नारायण राणेंचे टीकास्त्र
नाना पाटेकर काय म्हणाले?
आम्ही चव्हाट्यावरही जेवढी शिवराळ भाषा वापरली नाही, तेवढी शिवराळ भाषा सध्या राजकारणात ऐकायला मिळते. हे सगळं ऐकून मला खूप बरं वाटतं. आपल्यापेक्षा हे काही वेगळं नाही, असे मला वाटते, असे नाना पाटेकर खोचकपणे म्हणाले. तसेच तुम्ही जेव्हा चुकीचं बोलता तेव्हा आम्हाला त्रास होत नाही का? तुम्ही जनतेचे सेवक आहात हो. तुम्ही राज्यकर्ते नाही आहात, असेही नाना पाटेकर स्पष्टपणे म्हणाले. नाना पाटेकर राज्य तसेच देशातील सर्व राजकीय नेत्यांना उद्देशून बोलत होते.
एकनाथ शिंदे यांनी काय उत्तर दिले?
नाना पाटेकर यांच्या या विधानानंतर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. आम्ही राज्यकर्ते नाही तर जनतेचे सेवक आहोत, असे ते म्हणाले. तुम्ही जे म्हणाले ते अडीच वर्षांपूर्वी जाणवले असेल. आम्ही सत्तेत आल्यानंतर तीन महिन्यांपासून आम्ही शासनप्रमुख नाही, राज्यकर्ते नाही तर या राज्यातील जनतेचे सेवक आहोत. सेवक म्हणूनच आम्ही काम करणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही जेव्हा जनतेमध्ये जातो, ते काही लोकांना पटत नाही. मग त्याला काय करायचं? असा सवालही त्यांनी नाना पाटेकर यांना केला.
दरम्यान, नाना पाटेकर यांनी देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे यांची स्तुतीदेखील केली. “देवेंद्र फडणवीस हा माणूस मुद्देसूद बोलतो. त्याबद्दल वाद नाही. त्यांच्या बोलण्यात भावनेचा लवलेश नाही. त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे आहेत. शिंदे यांच्या बोलण्यात फक्त भावना असतात. त्यामुळे या दोघांचा एक चांगला समन्वय आहे. कुठलेही सरकार असले तरी मला सगळेच चांगले दिसतात. माझी वाईटामध्ये चांगले शोधायची सवय आहे. आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही काहीतरी चांगलं कराल, अशी अपेक्षाच नव्हे तर खात्री आहे,” असे नाना पाटेकर म्हणाले.