काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवरून देवेंद्र फडणवीसांना फटकारले आहे. तर, मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमधून निघणाऱ्या दुहेरी वक्तव्यांवरून त्यांनी सरकारमधील नेत्यांवर टीका केली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीत किती जागा मिळाल्यात याची यादी जाहीर करण्याचे आव्हान देवेंद्र फडवीसांना दिले.

नाना पटोले म्हणाले की, भाजपाला संधी देतो की जेवढ्या त्यांच्या जागा आल्या आहेत, त्याची यादी जाहीर करावी. खोटारडेपणा भाजपाने करू नये. लोकमताला अशापद्धतीने वळवू नये. मूळ प्रश्नांवरून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे.

हेही वाचा >> सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सदा सरवणकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तसंच, त्यांनी मराठा आरक्षणावरूनही सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले की, लोकांचं मूळ प्रश्नावर लक्ष विचलित करण्याकरता मराठा आरक्षणाचा प्रयोग केला जातोय. राज्यातील मंत्रिमंडळातील दोन मंत्री वेगवेगळी भाषा बोलतात. हे सरकार राहणार नाही असं त्यांचे मंत्री बोलत आहेत. आरक्षणाबाबत वातावरण पसरवण्याचं काम करून महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, बेरोजगारीवर, गुजरातहून जे ड्रग्स आणले जातात त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर भाजपाने दिली पाहिजेत, ही भूमिका काँग्रेसची आहे.

“जळता महाराष्ट्र नको. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. पण इथं ड्रग्स माफियाचं साम्राज्य निर्माण करून ठेवलं आहे. ड्रग्समध्ये नव्या पिढीला टाकलं जात आहे. ड्रग्समुक्त महाराष्ट्र पाहिजे. या राज्यात रोजगार निर्मिती झाली पाहिजे. जे उद्योग तुम्ही गुजरातला नेले आणि तरीही महाराष्ट्रच नंबर वन आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, पण वस्तुस्थिती भाजपाने मांडली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. काही मंत्र्यांना डेंग्यु झालेला आहे, कोण कुठे काय करतंय हे राज्याला काही कळायला मार्ग नाही. म्हणून भाजपाने सर्व वस्तुस्थिती मांडली पाहिजे”, असं नाना पटोले म्हणाले.

“आरक्षणाच्या नावावरून राज्य पेटवण्याचं काम सुरू झालं आहे. शासकीय संपत्ती पेटवल्या जात आहेत, आमदार सुरक्षित नाहीत, कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. राज्यस्तरीय बैठकीत आम्ही हीच भूमिक मांडली. आरक्षणाची सरकारची भूमिका जाहीर केली पाहिजे. जातिनिहाय जनगणना हा पर्याय आहे. गरीब आणि श्रीमंत अशा दोनच जाती निर्माण करण्याचा मोदींचा मनसुबा असेल तर तेही भाजपाने स्पष्ट केलं पाहिजे. त्या पद्धतीने आरक्षणाचं गाजर दाखवून लोकांची मते घ्यायची आणि दुसरीकडे आरक्षणच संपवायचा हा अजेंडा स्पष्ट केला पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.