राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विविध स्तरांवरून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपालांचे वक्तव्य बेताल असून त्यांनी मराठी माणसांची माफी मागावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

हेही वाचा – “हे पार्सल परत पाठवायला हवं”; वादग्रस्त व्यक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका

”राज्यपालांचे वक्तव्य बेताल आहे. महाराष्ट्राने गुजराती आणि राजस्थानी लोकांना पोसले आणि मोठे केले. अदानी-अंबानी या राज्यात मोठे झाले. आज हे वक्तव्य करून राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. यासाठी त्यांनी तमाम मराठी बांधवांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असून, भाजपने यांना परत बोलवावे, असेही नाना म्हणाले.

काय म्हणाले होते राज्यपाल?

शुक्रवारी (२९ जुलै) जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते.