अहिल्यानगर: राज्यात महायुती सरकार टिकले, तर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू राहील, अन्यथा गडबड होईल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज, सोमवारी नगरमध्ये बोलताना दिला. नंतर त्यांनी सरकारला कोणती अडचण नाही, पण पुढे जाऊन नवीन सरकार हा निर्णय बदलू शकते, अशी पुस्ती त्यांनी पत्रकारांशी बोलताना जोडली.
जिल्ह्यातील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) मंत्री झिरवळ यांची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी आज नगरमध्ये आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, ज्येष्ठ नेते अरुण तनपुरे, घनश्याम शेलार, संजय कोळगे, संपत बारस्कर, दत्ता पानसरे तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचे वरिष्ठ पातळीवरून संकेत दिले गेले आहेत. त्यासाठी तिन्ही पक्षांच्या सहा जणांची समिती स्थापन केली आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पालिका निवडणुकीमधील सर्व जागांवर अर्ज भरून ठेवले जाणार आहेत. पक्षाचा आदेश येईल, तसा पुढील निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री झिरवळ यांनी स्पष्ट केले. पक्षाकडे उमेदवारी मागितल्यानंतर ऐनवेळेला दुसरीकडे जाणारे यशस्वी होत नाहीत, स्वार्थासाठी दगा देणाऱ्यांची फजिती होते, असा इशारा देत त्यांनी, आज ना उद्या संधी मिळेल, यासाठी थांबावे लागले तर नाउमेद होऊ नये, असा सल्लाही दिला.
राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सध्या ढासळलेली असली, तरी अनेक चांगले निर्णयही सरकारने घेतले आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.
मुस्लिमांसोबत हिंदू मतेही मिळतात
भाजपकडून मुस्लिम मतांचे प्राबल्य असलेल्या जागा राष्ट्रवादीला देऊ केल्या जात आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात माझ्याकडे खंत व्यक्त केली आहे. आम्हाला केवळ मुस्लिम नव्हे, तर हिंदू मतेही मिळतात. आम्ही केवळ मुस्लिम मतांसाठी महायुतीमध्ये नाही, या संदर्भात आपण पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर संदेश पोहोचवला आहे, असेही मंत्री शिरवळ यांनी सांगितले. पक्षाचे नगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, याकडे लक्ष वेधले असता, मंत्री झिरवळ म्हणाले, ‘पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी जगताप यांना योग्य संदेश दिला आहे. त्यानंतर ते अशा कार्यक्रमांना गेलेले नाहीत.’
पार्थ पवार प्रकरणाचा मतांवर परिणाम नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा ऐन निवडणुकीच्या तोंडावर उघडकीस आला, याचा मतांवर परिणाम होणार नाही. निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांना विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. फळ देणाऱ्या झाडाला दगड मारले जातात. स्वार्थासाठी काहीजण अजित पवार यांना बदनाम करत आहेत, असा आरोपही मंत्री झिरवळ यांनी केला.
