फणा काढणारा नाग चक्क अवकाशात विहरतोय, वाघही डौलदारपणे घिरटय़ा घालतोय आणि बालगणेश जणू काही अवकाशातून पृथ्वीचे निरीक्षण करतोय, अशा वैविध्यपूर्ण रीतीने अवतरलेल्या पतंगींचा आनंद नाशिककरांना घेता आला ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी आयोजित ‘पतंग महोत्सव’च्या निमित्ताने. सोबतीला ‘एरोनॉटिकल शो’चीही मजा बच्चे कंपनीला घेता आली.
शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर हा महोत्सव नाशिककरांच्या प्रतिसादात झाला. ‘वाऱ्याच्या विरोधात संघर्षांतूनही जिद्दीने भरारी घ्या’ असा संदेश देत ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येवला येथील पारंपरिक पतंग व पतंगबाजांची कमालही या वेळी अनुभवता आली. नाशिक शहर पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे, या उद्देशाने ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने तीन वर्षांत विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. पतंग आणि नाशिक जिल्ह्यातील येवला यांचा अतूट संबध आहे. येवला येथे संक्रांतीच्या दिवशी तर दीपावलीप्रमाणे उत्सवी वातावरण असते. मैदानावर, गच्ची, छत, जिथे जागा मिळेल तिथे पतंग उडविणाऱ्यांची धूम असते. येवल्यातील या पतंग उत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने पतंग महोत्सवाच्या माध्यामातून प्रयत्न करण्यात येत आहेत. महोत्सवात येवला येथील पारंपरिक पतंगींसह तेथील पतंगबाज सहभागी झाले होते. ‘हलकडी’चा आवाज मैदानावर घुमत होता.
महोत्सवात गुजरातसह मुंबईचे काइट क्लब सहभागी झाले होते. एकाच वेळी एकाच दोऱ्याच्या साहाय्याने १०० पतंग कशा उडविल्या जातात, हेही या वेळी पाहावयास मिळाले.
पतंग महोत्सवासह या ठिकाणी विशेष एरोनॉटिकल शो झाला. रिमोटवर हवेत विहरणारी लहान विमाने तसेच हेलिकॉप्टरची मजा लहान्यांसह मोठय़ांनीही घेतली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी सर्वाचे स्वागत केले.
cap
नाशिक येथे ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित ‘पतंग महोत्सव व एरोनॉटिकल शो’मध्ये अवकाशात विहरणाऱ्या वैविध्यपूर्ण पतंगींसमवेत रिमोटवरील विमानांच्या उड्डाणाचा आनंद नाशिककरांनी घेतला.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2012 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये ‘पतंग महोत्सव’च्या जोडीला ‘एअर शो’
फणा काढणारा नाग चक्क अवकाशात विहरतोय, वाघही डौलदारपणे घिरटय़ा घालतोय आणि बालगणेश जणू काही अवकाशातून पृथ्वीचे निरीक्षण करतोय, अशा वैविध्यपूर्ण रीतीने अवतरलेल्या पतंगींचा आनंद नाशिककरांना घेता आला ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी आयोजित ‘पतंग महोत्सव’च्या निमित्ताने. सोबतीला ‘एरोनॉटिकल शो’चीही मजा बच्चे कंपनीला घेता आली.
First published on: 31-12-2012 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik kite festival huge response from public