गुन्हेगारी जगताशी संबंधित मोहन चांगले व त्याचा साथीदार दीपक सोनवणे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अखेर महापौरांचे बंधू अॅड. राजेंद्र रघुनाथ वाघ ऊर्फ दादा वाघ याच्यासह व्यंकटेश मोरे या दोघांना अटक केली आहे. शनिवारी न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या घटनेशी मनसेचा कोणताही संबंध नसल्याने सांगत प्रदेश सरचिटणीस आ. वसंत गिते यांनी यतीन वाघ यांच्या महापौरपदावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.
राजकीय वरदहस्त लाभलेला सराईत गुन्हेगार चांगले व सोनवणे यांचा गेल्या मंगळवारी रात्री टोळक्याने चढविलेल्या सशस्त्र हल्ल्यात मृत्यू झाला होता. यामुळे संतापलेल्या चांगले समर्थकांनी महापौरांचे शासकीय वाहन व बसवर दगडफेक केली होती. या हल्ल्यामागे महापौरांच्या भावाचा हात असल्याचा आरोप करून चांगले कुटुंबीयांनी तशी तक्रारही गंगापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून महापौरांचे बंधू अॅड. राजेंद्र वाघ ऊर्फ दादा वाघसह गिरीश अप्पू शेट्टी, अर्जुन संपत पगारे, राकेश कोष्टी व व्यंकटेश मोरे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अॅड. वाघ वगळता सर्व संशयित फरार झाले होते. सलग तीन दिवस चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अॅड. वाघला अटक केली. पाठोपाठ दुसरा संशयित व्यंकटेश मोरेलाही जेरबंद करण्यात आले. या दोघांना शनिवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची २० मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. गुन्हेगारी टोळक्यांमधील वादातून घडलेल्या या घटनेशी थेट महापौरांच्या भावाचे नाव जोडले गेल्यामुळे त्यांची महापौरपदावरून उचलबांगडी होते की काय, अशी साशंकता खुद्द मनसेच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या ‘गुपचूप’ नाशिक दौऱ्याचा संदर्भही त्यास जोडण्यात आला. या संदर्भात प्रदेश सरचिटणीस आ. गिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपरोक्त घटनेशी मनसेचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. यामुळे महापौर बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खुद्द महापौर यतिन वाघ यांनी आपल्या भावाचा त्या घटनेशी कोणताही संबंध नसताना हेतुपुरस्सर त्याला गोवण्यात आल्याची तक्रार केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2013 रोजी प्रकाशित
दुहेरी हत्याकांड प्रकरणी महापौरांच्या भावाला पोलीस कोठडी
गुन्हेगारी जगताशी संबंधित मोहन चांगले व त्याचा साथीदार दीपक सोनवणे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अखेर महापौरांचे बंधू अॅड. राजेंद्र रघुनाथ वाघ ऊर्फ दादा वाघ याच्यासह व्यंकटेश मोरे या दोघांना अटक केली आहे. शनिवारी न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या घटनेशी मनसेचा कोणताही संबंध नसल्याने सांगत प्रदेश सरचिटणीस आ. वसंत गिते यांनी यतीन वाघ यांच्या महापौरपदावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.
First published on: 12-05-2013 at 02:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik mayors brother arrested in double murder case