सोलापूर : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख भागीदार असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीकडून गांभीर्याने पावले टाकली जात आहेत. सोलापुरातील पक्षाचा उद्ध्वस्त झालेला बालेकिल्ला पुन्हा सावरण्याचा प्रयत्ना होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २ सप्टेंबर रोजी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत सोलापुरात राष्ट्रवादीची आढावा बैठक होणार आहे.

आगामी सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसह जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी राष्ट्रवादीची ही आढावा बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

सोलापुरात राष्ट्रवादीची ताकद क्षीण असून सध्या महापालिकेत पक्षाचे केवळ चारच नगरसेवक आहेत. शरद पवार यांच्याशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी जपलेल्या गुरूशिष्याच्या नात्यामुळे शहरात राष्ट्रवादीची ताकद आतापर्यंत मर्यादितच राहिली आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रवादीने खंबीर पावले टाकायला सुरुवात केली आहे.

पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे सध्या शिवसेनेत राहिलेले माजी महापौर महेश कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची धडपड चालविली आहे. तर दुसरीकडे एमआयएमचे ‘बाहुबली’ नेते तौफिक शेख यांनीही काँग्रेस व एमआयएमचा प्रवास केल्यानंतर आता सत्तेचे संरक्षण घेण्यासाठी राष्ट्रवादीचे दार ठोठावण्यास सुरुवात केली आहे. कोठे व शेख यांच्या काही समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसेनेतून तसेच एमआयएममधून अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काहींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

याशिवाय बसपा व बहुजन वंचित आघाडीचा अनुभव घेतलेले नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनीही चार नगरसेवकांसह राष्ट्रवादीशी संपर्क वाढविला आहे.