ग्रामीण भागात आरोग्य व शिक्षणाचे कार्य करणाऱ्या तसेच, सामाजिक सेवेच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा महादेव बळवंत नातू पुरस्कार यंदा भटक्या विमुक्त समाजासाठी काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरिश प्रभुणे यांना, तर सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार सोलापूर जिल्ह्य़ातल्या मोहोळ येथील पारधी समाजातील कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले यांना जाहीर झाला आहे.
नातू ट्रस्टचे विश्वस्त चंद्रशेखर यार्दी यांनी ही माहिती दिली. पुण्यात सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवन येथे ९ जानेवारी रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास चाफेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. गिरीश प्रभुणे यांना देण्यात येणाऱ्या नातू पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. ज्ञानेश्वर भोसले यांना देण्यात येणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच नातू ट्रस्टतर्फे यावेळी काही सामाजिक संस्थांना देणगी देण्यात येणार आहे.
त्यात सेवा भारती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचालित गुरुजी रुग्णालय, कमला मेहता रुग्णालय, ज्ञान प्रबोधिनी शिवप्रदेश, जनसेवा फाऊंडेशन, आरोग्य सेना, अस्तित्व प्रतिष्ठान आदी संस्थांचा समावेश आहे.