राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. त्याचसोबत नवी मुंबईतले राष्ट्रवादीचे ४८ नगरसेवकही आता भाजपात आले आहेत. नवी मुंबईत हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलं आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही.

 

गणेश नाईक हे नवी मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जात होते. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाच्या सोहळ्याला चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. गणेश नाईक हे विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरुच होती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला.

बुधवारी संध्याकाळी झालेल्या विशेष सोहळ्यात गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी हाती भाजपाचा झेंडा घेतला. गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने आता नवी मुंबईत भाजपाची ताकद वाढली आहे. ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे जगभरात आपल्या देशाची मान उंचावली. तसेच अनुच्छेद ३७० काश्मीरमधून रद्द करण्याचा धाडसी निर्णय आणि इतर अनेक चांगले निर्णय या सरकारने घेतले” असं गणेश नाईक यांनी भाजपा प्रवेशानंतर केलेल्या भाषणात म्हटलं आहे. इतकंच नाही तर, “मागील पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा खूप चांगल्या प्रकारे विकास केला” असंही त्यांनी म्हटलं आहे.

“गणेश नाईक भाजपात आले आहेत त्यामुळे आता भाजपाची नवी मुंबईतली चिंता मिटली आहे. जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते आता आपलं सरकार निश्चितपणे करेल. गणेश नाईक भाजपात आल्याने भाजपाला एक मोठं पाठबळ मिळालं आहे. मुंबई नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात नाईक यांना मांडणारा एक वर्ग आहे. लोकांची भरपूर कामं नाईक यांनी केली आहेत. त्यामुळे या सगळ्या लोकांचा पाठिंबाही आमच्यासोबत आला आहे.” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.