“छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेणार नाही”; राष्ट्रवादीच्या आमदाराची भाजपावर टीका

बेळगावमधील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटाकमधील भाजपा सरकराने हटवल्याचा मी तीव्र निषेध करतो असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर मनगुत्ती येथील पुतळा प्रकरणावरुन निशाणा साधला आहे. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या कर्नाटकातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला.  काल रात्री अश्वारूढ पुतळा काढण्यात आल्याने मराठी भाषिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. कन्नाडीगांच्या दबावामुळे हे कृत्य केल्याची सांगितले जात आहे. मात्र आता या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रावादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विटवरुन यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय घडलं?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील निपाणी हे एकीकरण लढ्याचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. निपाणीपासून जवळ असलेल्या मनगुत्ती गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा बसवताना रीतसर परवानगी घेण्यात आली होती. या पुतळ्यासाठी चौथऱ्याचे काम पूर्ण झाले होते. या चौथऱ्यावर त्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र तो काढून टाकावा असा पवित्रा पोलिसांनी घेतला. त्याला विरोध करण्यासाठी मनगुत्ती येथील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले होते. तेव्हा पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर मोठ्या बंदोबस्तात आलेल्या पोलिसांनी रातोरात या ठिकाणी येऊन हा पुतळा हटवला. त्यानंतर सीमा भागातून कन्नाडीगांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

रोहित पवार काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करताना हा पुतळा पुन्हा मूळ जागी सन्मानाने बसवावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. “बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटकातील भाजपा सरकारने हटवला याचा मी तीव्र निषेध करतो. कर्नाटक सरकारने हा पुतळा पुन्हा मूळ जागी सन्मानाने बसवावा,” असं रोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच ट्विटच्या शेवटी त्यांनी, “महापुरुषांचे विचार जपण्याची गरज असते. त्यांचा अवमान केलेला कोणीही खपवून घेणार नाही,” असा इशारच दिला आहे.

मनगुत्तीमधील हा पुतळा बसवण्यासाठी आंदोलन करण्याची आक्रमक भूमिका घेणाऱ्या स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. सीमाभागातील अनेकांनी समाज माध्यमातून पुतळा हटवण्याच्या निर्णयाचा कठोर शब्दात विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्नाटक शासनाला वावडे आहे का? असा शिवप्रेमी नागरिकांमधून सवाल केला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp mla rohit pawar slams karnatak bjp over chatrapati shivaji maharaj statue issue scsg

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या