वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. प्रशासनाने सरकारकडे नुकसानीचा अहवाल पाठविला. ८५ गावांतील शेतकऱ्यांसाठी ४० कोटींच्या मदतीची गरज असली, तरी हा निधी कधी मिळणार याकडेच शेतकऱ्यांचे सगळे लक्ष आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्चदरम्यान गारपीट व अवेळी झालेल्या पावसामुळे ४० हजार ८६७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. २५ हजार ५६७ हेक्टर शेतातील पिकांचे ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान झाले. शेतीपिकांचे प्रचंड नुकसान लक्षात घेऊन आपदग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या दृष्टीने सरकारने विशेष बाब म्हणून पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार कोरडवाहू शेतीस प्रचलित दर व याशिवाय अधिकची विशेष रक्कम असे १० हजार रुपये, ओलिताखालील शेतीस प्रचलित दर व याशिवाय अधिकची विशेष रक्कम असे १५ हजार रुपये, बहुवार्षिक फळपिकांसाठी प्रचलित दर व व्यतिरिक्त अधिकची विशेष रक्कम अशी एकूण २५ हजार रुपयांची मदत देण्याचा, तसेच पेरणी केलेल्या क्षेत्रातील मर्यादित जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत देय राहील. कोरडवाहू व ओलिताखालील शेतीसाठी मदतीची किमान मर्यादा ७५० रुपये व बहुवार्षिक फळपिकांसाठी मदतीची मर्यादा दीड हजार रुपयांइतकी असेल.
या प्रमाणे बाधित शेतकऱ्यांची जानेवारी ते जून या कालावधीची २० देयके सरकार भरणार आहे. शेतीपीक कर्जाबाबत बाधित शेतकऱ्यांकडून संबंधित बँकेने येत्या डिसेंबरअखेपर्यंत सक्तीने कर्जवसुली करू नये व डिसेंबर अखेपर्यंत शेती पिकांच्या कर्जाची परतफेड करण्यास मुद्दवाढ द्यावी. २०१३-१४ या वर्षांसाठी बाधित शेतकऱ्यांचे शेतीकर्जाचे व्याज राज्य सरकारमार्फत भरण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांच्या कर्जाचे ३ वर्षांसाठी (२०१४-१५ ते २०१६-१७) शेती पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना, तसेच घरांच्या नुकसानीबाबत ३० जानेवारीचा शासननिर्णय लागू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसामुळे ४० हजार ८६८ हेक्टर शेतावरील पिकांचे नुकसान झाले. यात २५ हजार ५६७ हेक्टर नुकसान ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक असून, हे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीला पात्र ठरणार आहेत. नुकसानीचे क्षेत्र पाहता जिल्ह्यात ८५ गावांतील शेतकऱ्यांसाठी ४० कोटींच्या मदतीची गरज आहे. सरकारने मदतीबाबत निर्णय घेतला. मात्र, आता मदत पदरात कधी पडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.