पहिल्या मराठी प्रबंधाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याकडे दुर्लक्ष झाले असतानाच मराठी प्रबंधांच्या सूचीबाबत ज्येष्ठ तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांकडे विद्यापीठांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.
पुणे विद्यापीठातील माजी मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. अविनाश आवलगावकर यांनी मराठी प्रबंधांच्या सूचीचे महत्त्व वादातीत असल्याचे विधान केले आहे. संशोधनाचा आजवरचा इतिहास आणि संशोधनासाठीचे नवे विषय याची माहिती या प्रबंध सूचीतून मिळते. अनेक होतकरू संशोधकांना यामुळे नव्या वाटा गवसणार आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. मराठी वाङ्मय इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. दत्तात्रेय पुंड यांनीही मराठीच्या अभ्यासकांसाठी प्रबंध सूचीचे संकलन भविष्यात मोलाचे ठरेल, याची कल्पना विद्यापीठांना दिली होती. डॉ. रत्नाकर मंचरकर यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या उदासीनतेबद्दल खंत व्यक्त करताना उपयुक्त सूचींची आता तरी विद्यापीठांनी दखल घ्यावी, असे आवाहन केले होते. व्यासंगी संशोधक डॉ. शं.गो. तुळपुळे यांची प्रतिक्रिया तर अधिक बोचरी आहे. प्रबंध म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ असताना अनेक जण मात्र तो शेवट असल्याचे समजतात. त्यामुळे मराठीतील अलीकडचे प्रबंध स्थूल संशोधनापुरते मर्यादित असून पीएच.डी. मिळाल्यावर लोक स्वस्थ बसतात, अशी टीका त्यांनी केली.