वर्धा : देशभरात नावाजले जाईल, असे एक आदर्श पर्यटन केंद्र व्हावे म्हणून शासनपुरस्कृत पवनार विकास आराखडय़ाबाबत गांधीवादी विरुद्ध गावकरी असा पेच उभा झाला आहे. मात्र यात गांधीवाद्यांची भूमिका चर्चेअंती मवाळ झाल्यानंतर आता पवनार गावाच्या विकासाचे काय असाही तिढा आहेच.

आचार्य विनोबा भावे यांच्या सुप्रसिद्ध परंधाम आश्रमाभोवताली हे सौंदर्यीकरण होत आहे. धाम नदीचे पात्र, ऐतिहासिक पाश्र्वभूमी, महामार्गालगत वाहतूक, निसर्गसंपदा अशा बाबींमुळे सध्याच हा परिसर पर्यटकांचा आकर्षणबिंदू आहे. पण त्याचा सर्वागीण विकास केल्यास देशभरातील पर्यटकांचा ओढा या ठिकाणी वळू शकतो, असा हेतू ठेवून ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार झाला. मात्र प्रस्तावावर गांधीवाद्यांनी आक्षेप नोंदविला. आश्रमलगतच्या घाटावर बांधकाम झाल्यास परिसर विद्रूप होईल, पर्यटकांचा गजबजाट आश्रमाची शांतता भंग करेल, नदीचे प्रदूषण वाढेल, असे आक्षेप आल्यानंतर शासनाने हात आखडता घेतला. गांधीवाद्यांशी चर्चा केली. त्यांच्या काही शंकाचे निरसन केले. मात्र गांधीवादी या प्रकल्पास विरोध करीत असल्याचे चित्र उमटताच पवनारवासी संतप्त झाले. आश्रमवासी विरुद्ध गावकरी हा जुनाच वाद आहे. या नव्या प्रकल्पामुळे त्याला पुन्हा धार चढली. गांधीवादी विकासास खीळ घालत असले तरी आम्हाला हा प्रकल्प हवा आहे, असा गावकऱ्यांचा सूर आहे. प्रकल्प व्हावा म्हणून ग्रामसभेचा ठरावही झाला. हा वाद चिघळू नये म्हणून मग प्रकल्प तर करायचाच, पण गांधीवाद्यांशी वेळोवेळी चर्चाही करायची, अशी भूमिका शासनाने घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता यात प्रकल्प तयार करणाऱ्या ‘इनव्हायरो डिझायनर्स’ या कंपनीची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आराखडा तयार झाल्यानंतर त्यांनी गांधीवाद्यांशी चर्चा केली. मात्र वेळोवेळी येणाऱ्या सूचनांमुळे प्रकल्पास बाधा निर्माण होत आहे. प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनीही पाहणी करीत नदीपात्राचा विषय उपस्थित केला. नदीचे संपूर्ण पात्र १५० फुटांवर नाही. केवळ आश्रमालगतच ते विस्तारले आहे. त्यामुळे बाधा येण्याचा प्रश्नच नसल्याचे गावकरी म्हणतात.

गांधीवादी आता शांत असल्याचे चित्र दिसत असतानाच गावकऱ्यांनी गावाच्या विकासाचा मुद्दा मांडला आहे. ग्रामपंचायतीने दहा कोटींचा प्रस्ताव सादर केला. केवळ पर्यटक केंद्र होणे पुरेसे नाही. या ठिकाणी भेट देणारे पर्यटक गावात येतील. त्यामुळे रस्ते, नाले, पथदिवे, सभागृह या कामांची गरज आहे. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची बाब आहेच. रोजगार उपलब्ध होतील, पण पर्यटकांचा भार गावावर पडू नये, याची दक्षता कोण घेणार, असा सवाल सरपंच अजय गांडोळे हे करतात. आमदार डॉ. पंकज भोयर यांची सर्व अडथळे दूर होऊन हे पर्यटन केंद्र साकार होईल असा विश्वास व्यक्त केला.

माझ्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी फार पूर्वी चर्चा केली होती. त्यानंतर कुणीही विचारले नाही. आश्रमाचे माहात्म्य जपले जावे, ही सर्वाची इच्छा आहे. भेट घेण्यास इच्छुक अभियंते आलेच नाही. सद्य:स्थितीबाबत फोरशी माहिती नाही.

– गौतम बजाज, अध्यक्ष, पवनार आश्रम

प्रकल्प होणारच आहे. आराखडय़ानुसारच हे काम व्हावे. बदल करू नये. तसा ठराव आम्ही दिला आहे. आता महत्त्वाचा मुद्दा गाव विकासाचा आहे. निधीसह तो मंजूर झाल्याची माहिती आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील, अशी अपेक्षा आहे.

– अजय गांडोळे, सरपंच

आराखडा पूर्णत: तयार आहे, पण आश्रमातून सूचना येतात. त्याचे पालन करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. मुळात मी स्वत: पर्यावरण अभ्यासक असून आमची कंपनी प्रथम पर्यावरण जपण्यावर भर देते. पर्यावरण धोक्यात येण्याची शंका गैरलागू आहे.

– उल्हास राणे, संचालक, ‘इनव्हायरो’