दै. देशोन्नतीचे मालक व मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या अंगरक्षकाने देशोन्नतीच्या छापखान्याच्या कर्मचाऱ्यांवर शनिवारी रात्री केलेल्या गोळीबारात एका सुरक्षा अधीक्षकाचा मृत्यू झाला. अंगरक्षकाला गोळीबाराचे आदेश दिल्याप्रकरणी पोहरे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर कळमेश्वर पोलिसांनी खून, दंगल तसेच गोळीबार करण्यास चिथावणी दिल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
अमरावती मार्गावरील गोंडखैरी येथील देशोन्नतीचा छापखाना पोहरे यांनी ७ सप्टेंबर रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केला. तसेच छापखान्यातील साहित्य तेथून नेण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण औद्योगिक न्यायालयात प्रलंबित असतानाच शनिवारी सायंकाळी पोहरे आपल्या पाच अंगरक्षकांसह छापखान्याच्या ठिकाणी आले. या वेळी संतप्त कामगारांनी त्यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. पोहरे, त्यांचे अंगरक्षक तसेच आंदोलनकर्त्यां कामगारांमध्ये बाचाबाची, झटापट व मारामारी झाली. त्या वेळी पोहरे यांनी आपल्या अंगरक्षकास गोळीबाराचे आदेश दिले. त्यानंतर झालेल्या गोळीबारात छापखान्याचे सुरक्षा अधीक्षक राजेंद्र दुपारे जबर जखमी झाले व रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
पोहरे यांच्या इशाऱ्यावरून ज्याने गोळी झाडली त्या हरिचरण रामप्यारे द्विवेदी याला कामगारांनी पकडून ठेवले. तो दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, पोहरे यांनी घटनास्थळावरून पलायन केले. ग्रामीण पोलिसांची विविध पथके त्यांच्या मागावर आहेत.
दरम्यान, रविवारी सकाळी वैद्यकीय रुग्णालयात दुपारे यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्या वेळी पोहरे यांना अटक करावी, पालकमंत्र्यांनी घटनास्थळी भेट द्यावी, राजेंद्र दुपारे याच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्या पूर्ण होईपर्यंत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार देत इतर कामगारांनी शवागारापुढे ठिय्या दिला. पोलीस उपायुक्त चंद्रकिशोर मीणा यांनी कामगारांची समजूत घातल्यानंतर दुपारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.