लोकसभा निवडणुकीत आम्ही राज ठाकरेंना बरोबर घेतलं नव्हतं, आगामी विधानसभा निवडणुकीतही आमच्या महायुतीतील सहा पक्षांचाच समावेश असेल, सातवा पक्ष घेण्याचा प्रश्नच नाही, असे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना आमच्या पक्षात स्थान दिले जाणार नाही, असेही मुंडे म्हणाले.
मुंडे यांनी आज, रविवारी सपत्नीक शिर्डी येथे हजेरी लावून साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांनतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबईत काल राष्ट्रवादीची पार पडलेली बैठक म्हणजे शरद पवारांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. आता वेळ कधीच निघून गेली आहे, पवारांनी मंत्र्यांना दिलेल्या कानपिचक्यांचा परिणाम होणार नाही. जे १५ वर्षे सत्तेत असतांना काहीच करु शकले नाहीत ते दोन महिन्यात काय करतील? अशी खरमरीत टीकाही मुंडे यांनी केली. पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात येण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे, यावर बोलतांना मुंडे म्हणाले, आमच्याकडे पटेलांना स्थान नाही. पवार जरी कितीही भाजपाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांनाही आमच्याकडे स्थान देणार नाही.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात ३२ ते ३५ जागा मिळतील तसेच देशात भाजपला २४५ जागा मिळतील असा दावाही मुंडे यांनी केला. केंद्रात एनडीए आणि घटक पक्ष यांचेच बहुमत होणार असल्याने आम्ही इतर पक्षांची मदत घेणार नाही व तशी गरजही पडणार नाही असे स्पष्ट करुन मुंडे म्हणाले, काँग्रेस पक्ष दिशाहीन झालेले जहाज आहे. काँग्रेसवर कोणत्याही एका व्यक्तीचे नियंत्रण नसल्याने त्यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केला नाही. लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा पराभव अटळ असल्याने त्यांनी केवळ आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या स्तरावर जावून टीका केली. भाजपने मात्र खालच्या स्तरावर जावून टीका केली नाही, महाराष्ट्रात राज्य सरकार दलितांना सरंक्षण देवू शकत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले
लोकसभा निवडणुकीत आम्हाला स्व. प्रमोद महाजन व शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची उणीव भासली. हे दोन नेते आज असते तर त्याचा फायदा भाजपला मोठय़ा प्रमाणावर झाला असता. केंद्रात एनडीएचे सरकार आल्यास त्यांच्याकडे आपली कोणती अपेक्षा नाही, मला कोणते मंत्री पद हवे आहे हे पंतप्रधान ठरवतील. सध्या मी अत्यंत समाधानी आहे. काँग्रेसचे दिवगंत नेते विलासराव देशमुख व मी चांगले मित्र होतो. मात्र विलासरावांची उणीव माझ्यापेक्षा काँग्रेसला जास्त जाणवली असणार आहे, असेही मुंडे यांनी सांगीतले.