जागावाटपाचा तिढा सुटला नाही तरी स्वबळावर लढणार आहोत. आघाडीला मदत करण्याची आणि युतीला विरोध करण्याची भूमिका आहे असे खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे सांगितले. यातून त्यांनी आपली नवी राजकीय दिशा आज स्पष्ट केली.

महाआघाडीने दोन जागा स्वाभिमानाला द्याव्यात, अन्यथा मला हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढणे भाग आहे. मात्र मी चालत्या गाडीला गुना लावणार नाही की आघाडीला अपशकुन करणार नाही. राज्यात अन्यत्र उमेदवार उभे करणार नाही. मतविभागणीचा फायदा भाजप, शिवसेनेल होईल असे काही करणार नाही, त्यात आमचे कितीही नुकसान झाले तरी सुद्धा असे स्पष्टीकरण शेट्टी यांनी दिले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांनी आज त्यांचे गतवेळचे प्रतिस्पर्धी, काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची भेट घेतली. आवाडे यांनी आघाडीच्या निर्णयानुसार शेट्टी यांना निवडणुकीसाठी काँग्रेसच्यावतीने संपूर्ण मदत केली जाईल, असे आश्वस्त केले. त्यानंतर शेट्टी यांनी इचलकरंजी काँग्रेस भवनात जाऊन आपली भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर मांडून सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, सेवादलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश सातपुते, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे उपस्थित होते. नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रास्ताविक केले.

या बैठकीनंतर शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘संघर्ष हा माझा स्वभाव आहे. आता निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला परिस्थितीने एकत्र आणले आहे’, असा उल्लेख करून शेट्टी म्हणाले,’ मागीलवेळी मी त्यांच्यासोबत गेलो, पण मोठा अपेक्षाभंग झाला. केंद्र सरकारच्या निष्क्रिय कामगिरीमुळे नरेंद्र मोदी – अमित शहा वगळता सर्वजण नाराज आहेत. शेती, वस्त्रोद्योग याची वाताहत झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

सांगलीची जागा आणि त्यावरून सुरु झालेल्या वादाविषयी विचारणा केली असता ते म्हणाले, ‘स्वाभिमानीने सांगलीचा आग्रह कधीच धरला नव्हता. दोन जागांसाठी आमची मागणी कायम आहे. त्याबद्ल्यात शिर्डी घेण्याची लवचिकता असून हा निर्णय काँग्रेसने घ्यायचा आहे. ज्यांच्या सहकारी संस्था अन्य मार्गामुळे अडचणीत आल्या तेच बहुसंख्येने युतीमध्ये प्रवेश करत आहेत. युतीच्या कोल्हापुरातील प्रचारावेळी माझ्यावर चोराच्या आळंदीत सहभागी झाल्याची टीका केली होती, पण मंचावर शेतकऱ्यांना बुडवणारे कोण कोण बसले होते हे त्यांनी नीटपणे पाहावे. लुच्च्या लोकांतून मी लवकर बाहेर पडलो हेच बरे झाले, अशा लोकांना शॉक ट्रीटमेंट द्यायला हवी, असा प्रतिटोला राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.