बालभारतीच्या काही पुस्तकांत छापण्यात आलेल्या राष्ट्रगीतामध्ये ‘सिंध’ शब्दाऐवजी ‘सिंधु’ असे छापण्याची झालेली चूक एक परिपत्रक काढून शासनाला दुरुस्त करता येईल. ही चूक झाली म्हणून यंदा छापलेली आणि विद्यार्थ्यांना राज्यभर वितरित केलेली सात लाख पुस्तकेच नष्ट करावी, अशी मागणी समर्थनीय ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी प्रकशित केलेल्या इयत्ता पहिली ते दहावीच्या बालभारतीच्या इंग्रजी आणि मराठी माध्यमातील काही पुस्तकांत कविवर्य रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले ‘जनगणमन अधिनायक जय हे’ हे राष्ट्रगीत छापले आहे. या गीतातील मूळ ‘सिंध’ या शब्दाऐवजी ‘सिंधु’ अशी चूक आहे. या शब्दाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी जनहित याचिका मुलुंड (मुंबई) येथील शाळाबाह्य़ मुलांसाठी कार्य करणाऱ्या दक्षता शेठ यांनी दाखल केली असून चुकीचा शब्द असलेली सर्व पुस्तके शासनाने परत घेऊन नष्ट करावी आणि दोषी व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करावे, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.
या संदर्भात वसंत पुरके म्हणाले, व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालता येणार नाही आणि एखाद्या कवीच्या मूळ रचनेत कोणालाही बदल करता येणार नाही. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेदेखील राष्ट्रगीतात दुरुस्ती करण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. भारतासारख्या देशाच्या भौगोलिक रचनेत बदल झाला तरी राष्ट्रगीतातील मूळ शब्द बदलता येणार नाही, असे न्यायालयाने (विशेषत: सिंध शब्दाच्या संदर्भात) स्पष्ट केले आहे.
दक्षता शेठ यांच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड व न्यायमूर्ती एस. जी. गुप्ते यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला आणि गृह खात्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी करून सरकारला २ ऑगस्टपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘आपले राष्ट्रगीत राज्य सरकारला ठाऊक नाही काय?’ असा प्रश्नही न्या. चंद्रचूड यांनी विचारला आहे. अतिरिक्त सरकारी वकील अभिनव वाग्यानी यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार जवळपास ७ लाख पुस्तके छापली गेली आहेत. सरकार या मुद्दय़ावर लवकरच निर्णय घेणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jul 2013 रोजी प्रकाशित
बालभारतीची सात लाख पुस्तके नष्ट करणे अनुचित -प्रा. पुरके
बालभारतीच्या काही पुस्तकांत छापण्यात आलेल्या राष्ट्रगीतामध्ये ‘सिंध’ शब्दाऐवजी ‘सिंधु’ असे छापण्याची झालेली चूक एक परिपत्रक काढून शासनाला दुरुस्त करता येईल. ही चूक झाली म्हणून यंदा छापलेली आणि विद्यार्थ्यांना राज्यभर वितरित केलेली सात लाख पुस्तकेच नष्ट करावी, अशी मागणी समर्थनीय ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

First published on: 15-07-2013 at 02:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not right to destroy seven lakh books of bal bharti vasant purke