विदर्भातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत असून चार प्रकल्प पूर्णपणे आटले आहेत. मोठय़ा, मध्यम आणि लघू सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा ३६ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. महिन्याभरात विदर्भातील मोठय़ा, मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील जलसाठा तब्बल १० टक्क्यांनी कमी झाला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात विदर्भातील प्रकल्पांमध्ये असलेला ४६ टक्के पाणीसाठा आता ३६ टक्क्यांवर आला आहे. नागपूर विभागातील प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३९ टक्के, तर अमरावती विभागात ३३ टक्के जलसाठा आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ातील सिंचन प्रकल्पांचा अपवाद वगळता विदर्भातील बहुतांश सिंचन प्रकल्पांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात मुबलक जलसाठा झाला होता. अनेक प्रकल्प तुडुंब भरले, अप्पर वर्धा प्रकल्पासह अनेक मोठय़ा प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले होते. लघू सिंचन प्रकल्पांमध्ये मात्र कमी पाणीसाठा होता. त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. पाण्याची मागणी वाढत असल्याने धरणांमधील जलसाठादेखील झपाटय़ाने कमी होत आहे. आठवडय़ाभरात अमरावती विभागातील पाणीसाठा ३ टक्क्यांनी, तर नागपूर विभागातील प्रकल्पांमधील जलसाठा २ टक्क्यांनी कमी झाला आहे. महिनाभरात मध्यम प्रकल्प ९ टक्क्यांपर्यंत, तर लघू प्रकल्प १० टक्क्यांनी आटले आहेत. गेल्या काही वर्षांत पाण्याचा वापर वाढला आहे. अनेक मोठय़ा शहरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी या धरणांमधूनच उद्भव आहे. मध्यम शहरांच्या पाणीपुरवठा योजनादेखील या धरणांवरच अवलंबून आहेत.
विदर्भातील सर्व ७३६ सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या २ हजार ५३३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गेल्या ११ फेब्रुवारीला तो ३ हजार २१६ दलघमी इतका होता. मोठय़ा प्रकल्पांमध्ये सध्या १ हजार ७६४, मध्यम प्रकल्पांमध्ये ४०६ आणि लघू प्रकल्पांमध्ये ३६३ दलघमी पाणी शिल्लक आहे. मोठे प्रकल्पही झपाटय़ाने आटत आहेत. पेनटाकळी आणि खडकपूर्णा या प्रकल्पांमध्ये जलसाठवणूक नव्हती. बाघ कालीसरार आणि दिना प्रकल्पात तर पाण्याचा टिपूसही शिल्लक नाही. नळगंगा, बेंबळा, पेंच रामटेक, निम्न वेणा नांद, बाघ पुजारीटोला, बोर, पोथरा, आसोलामोंढा या मोठय़ा प्रकल्पांमध्ये तर सद्यस्थितीत ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. नळगंगा प्रकल्पाचा पाणीसाठा केवळ ९ टक्के, तर निम्न वेणा नांद प्रकल्पात २ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
अनेक लघू प्रकल्पांमधून शहरे आणि खेडय़ांची तहान भागवली जाते. या प्रकल्पांमध्ये आता अपुरा पाणीसाठा असल्याने पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. सिंचन प्रकल्पांमधून सिंचनाखेरीज औद्योगिक वापरासाठी पाण्याचा मोठा साठा घेतला जातो. सिंचन प्रकल्पांमधून रब्बी हंगामासाठी पाणी सोडले जात असल्याने हा पाणीसाठा कमी होत असल्याचे चित्र दिसत असले, तरी गेल्या काही वर्षांत उद्योगांसाठी या सिंचन प्रकल्पांमधून मोठय़ा प्रमाणावर वापर वाढला आहे. त्याचा परिणाम जलसाठय़ावर जाणवू लागला आहे. दुसरीकडे सिंचनासाठी आवर्तन सोडताना पाण्याचा योग्य आणि पूर्ण क्षमतेने वापर होत नाही, असे निदर्शनास आले आहे. सदोष पाटचऱ्या आणि नियोजनाअभावी अनेक भागात सिंचनासाठी सोडलेले पाणी वाया जात असल्याने सिंचन विभागाला ही गळती रोखण्यासाठी प्रथम उपाय करायला हवेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.