scorecardresearch

सोलापूरच्या ‘एनटीपीसी’मध्ये चार दिवस पुरेल एवढाच कोळसा 

सोलापूरजवळील फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पाला कोळसा टंचाईची झळ बसत असून ऊर्जा निर्मितीसाठी पुढील चार दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे.

सोलापूर : सोलापूरजवळील फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पाला कोळसा टंचाईची झळ बसत असून ऊर्जा निर्मितीसाठी पुढील चार दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, प्रत्येकी ६६० मेगावाट निर्मिती क्षमतेच्या दोन युनिटपैकी एक युनिट सध्या बंद आहे.

सोलापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर फताटेवाडी येथे गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या एनटीपीसी प्रकल्पात औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी दररोज १८ ते २० हजार मेट्रिक टन कोळसा वापरला जातो. सध्या प्रकल्पस्थळी ६५ हजार मे. टन कोळसा शिल्लक आहे. हा कोळसा पुढील चार दिवसांची गरज भागवू शकतो. प्रकल्पाचे मुख्य सरव्यवस्थापक एन. एस. राव यांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी सध्या ऊर्जा निर्मितीचे एक युनिट काही दिवसांकरिता बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एकाच युनिटमधून दररोज ६६० मेगावॉट ऊर्जा निर्मिती होत आहे.

सध्या राज्यात विजेची मागणी वाढली असताना त्याप्रमाणे वीज पुरवठा होत नाही. मागणी आणि उपलब्धता यात तफावत आहे. ऊर्जा प्रकल्पांना कोळसा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सोलापूरच्या एनटीपीसी प्रकल्पासाठी सुमारे ७०० किलोमीटर दूर अंतरावरून कोळसा आणावा लागत असला तरी आतापर्यंत कोळशाची फारशी कमतरता भासली नाही. ओडिशाच्या महानदी कोल फिल्डस् आणि आंध्र प्रदेशातील सिंगरेनी कोलरीज कंपनी या दोन कोळसा पुरवठा करणाऱ्या प्रमुख कंपन्यांबरोबर सोलापूर एनटीपीसीने यापूर्वीच करार केल्यामुळे कोळसा टंचाईचा प्रश्न निर्माण झाला नाही. कोळसा उत्पादक कंपन्यांशी आपला सातत्याने संपर्क असतो. आपले प्रतिनिधी संबंधित कंपन्यांकडे कोळसा पुरवठय़ासाठी पाठपुरावा करीत असतात, असे राव यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ntpc solapur coal thermal power generation project scourge scarcity ysh

ताज्या बातम्या