पानेवाडी येथील भारत पेट्रेलियमच्या इंधन प्रकल्पात टँकर वाहतूक दरात वाढ करावी, या मागणीसाठी वाहतूकदारांनी संप सुरू केल्याने इंधन वितरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र,  मराठवाडय़ासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्य़ांमध्ये या प्रकल्पातून सुमारे २०० टँकरव्दारे इंधनपुरवठा केला जातो.
या प्रकल्पातून राज्यात इतरत्र टँकरने इंधन वाहतूक करण्याच्या टेंडरची मुदत संपून दीड वर्ष झाले आहे. वाहतूक दरात वाढ करण्यासाठी टेंडर मागवावेत, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वीच टँकर चालकांनी संप केला होता. त्यावेळी प्रशासनाने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. कंपनीने नव्या दरासाठी टेंडर अर्जही काढले. परंतु दर वाढवून देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. या चालढकल करण्याच्या प्रकारामुळे वाहतूकदारांमध्ये नाराजी निर्माण झाली. कंपनी प्रशासनाशी चर्चा केल्यानंतरही ठोस निर्णय झाला नाही. वाहतूकदारांनी प्रतिलिटर सात ते आठ रुपये दर वाढवून मागितला आहे. कंपनी प्रशासन फक्त एक रुपयाची वाढ करण्यास तयार असल्याचे सांगितले जाते. भारत पेट्रोलियमच्या या मनमानी कारभारास व दबाव तंत्रास वाहतूकदारांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे.
 त्यामुळे पेट्रोल व डिझेल पुरवठय़ावर परिणाम होणार आहे.  प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे हा अघोषित संप सुरू झाल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत तातडीने कंपनी प्रशासनाने हस्तक्षेप करून दर वाढवून द्यावेत, अन्यथा महाराष्ट्रातील इंधनपुरवठय़ावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.