कोणत्याही शहराच्या विकासात हवाई जोडणी अतिशय महत्वाची ठरते. जगात दुबई व सिंगापूरसह अनेक शहरांचा विकास त्यामुळे झाला आहे. ओझर येथे साकारलेले विमानतळ नाशिक जिल्ह्याच्या विकासात अशीच महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असा विश्वास अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर जानोरी गावाजवळ साकारण्यात आलेल्या विमानतळाचे सोमवारी पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन सोहळ्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली.
सायंकाळी ओझर विमानतळावर झालेल्या या सोहळ्यास नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खा. समीर भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ओझर विमानतळ अतिशय सुबकपणे साकारण्यात आले आहे. या ठिकाणी आल्यावर आपण नेमको कोठे आहोत, असा प्रश्न पडत असल्याचे पटेल यांनी सांगितले. पुढील दीड ते दोन दशकानंतर नाशिक कसे असेल याचा विचार करून या विमानतळाची बांधणी झाली आहे. कोणत्याही भागाच्या विकासात हवाई जोडणी हा कळीचा मुद्दा असतो. नाशिक जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी हे विमानतळ महत्वपूर्ण ठरणार असल्याचे पटेल यांनी नमूद केले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जानोरीकडून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे जाहीर केले. ओझर विमानतळाची धावपट्टी ही देशातील सर्वात मोठी लांबीची धावपट्टी आहे. विमानतळामुळे स्थानिक पातळीवरील उद्योगधंद्यात वाढ होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल तसेच नाशिकच्या आर्थिक क्षमतेत वाढ होईल, असे भुजबळ यांनी सांगितले. महसूल मंत्र्यांना उद्देशून त्यांनी मुद्रांक दरात कमालीची झालेली वाढ कमी करण्याची मागणी केली.