जीवन जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रशासकीय यंत्रणेच्या अविरत प्रयत्नामुळे कूपनलिकेतून माणिक रत्नाकर वायगड (वय ७५) या वृद्धाची मृत्यूशी सुरू असलेली जीवघेणी झुंज १४ तासांनी यशस्वीरीत्या संपली. गुरुवारी पहाटे तीनच्या दरम्यान वायगड यांची सुखरूप सुटका झाली आणि रात्रभर तळ ठोकून असलेल्या जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह अधिकाऱ्यांनीही नि:श्वास सोडला. सर्वाचेच चेहरे समाधानाने उजळले.
वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे राजाभाऊ काळे यांच्या शेतातील कूपनलिकेत बुधवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्याच शेतात काम करणारे व नात्याने मामा असलेले माणिक वायगड पाय घसरून पडले. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. सायंकाळी स्वत: घटनास्थळी जाऊन मोहिमेत सहभाग घेतला. सुमारे ३० फूट खोल अडकलेल्या वायगड यांना सुरुवातीला प्राणवायू पुरविण्यात आला. काळे यांनी कूपनलिकेतून वायगड यांच्याशी सतत संपर्क ठेवला.
कूपनलिकेचा अंदाज घेऊन जेसीबी व पोकलेन मशीनने ३० फूट खोल खड्डा घेण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमारास सुटकेचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असतानाच मशीनच्या हादऱ्याने वायगड आणखी खोल गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी स्वत: खड्डय़ात उतरून निर्देश दिले. अखेर पहाटे तीनच्या सुमारास वायगड यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. लागलीच त्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कूपनलिकेत अडकल्यानंतरही वायगड यांची जगण्याची दुर्दम्य जिद्द, तसेच प्रशासनाचे गतिमान प्रयत्न यामुळे चौदा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही मोहीम फत्ते झाली. वायगड यांना सुखरूप बाहेर काढल्यानंतरच जिल्हाधिकारी केंद्रेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी टाकसाळे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक परतले.