पुणे-नगर रस्त्यावर रांजणगाव गणपतीजवळील राजयोग हॉटेल येथे मंगळवारी पहाटे दुभाजक तोडून कंटेनरने पुणे-कळंब बसला धडक दिली. या अपघातामध्ये बसमधील एक ठार तर दहा जण जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमद रज्जाक शेख (वय ३०, रा. परतूर, जि. बीड) यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर बसचे चालक राजाराम विलास ठुबे (माळेगाव, ता. बार्शी), गोपीनाथ संभाजी होळकर (वय ६९ वडगाव, ता. केज), अनिल विलास खंडागळे (रा. सांगवी, ता. केज),उत्तमराव महादेव साठे (वय ३०, रा, सांगवी), भागवत पंढरीनाथ शिंदे (वय ६५ रा. इटकूर ता.कळंब), वनमाला भागवत शिंदे (वय ५५ रा. इटकूर ता. कळंब ), शंकर कमलाकर सरवदे (वय २२ भूम), दशरथ बापू अंगारखे (वय ६५ रा. दहिफळ, जि. उस्मानाबाद), अरविंद रावसाहेब गेरंगे (वय२५, रा. निमळज, जि. नगर), अमोल भगवान गोसावी (वय २५ रा, निमळज, नगर) आणि विनोद अर्जुन तावडे झिंगर (ता. वाशी ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर हा नगरकडून पुण्याकडे जात होता. तर बस ही पुण्याहून कळंबकडे निघाली होती. पहाटे तीनच्या सुमारास रांजणगाव गणपती येथील राजयोग हॉटेल येथे कंटनेरच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनर रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला गेला. समोरून येणाऱ्या पुणे-कळंब बसवर जाऊन आदळला. त्यानंतर त्या ठिकाणच्या खांबाला धडकला. या अपघातामध्ये शेख यांचा मृत्यू झाला, तर बसच्या चालकासह दहा जण जखमी आहेत. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमर जगदाळे हे अधिक तपास करत आहेत.