मुंबईहून सिन्नरकडे जाणाऱ्या गॅस टँकरने मंगळवारी सकाळी कसारा गावाजवळ महामार्गावर अपघातग्रस्त झालेल्या कंटेनरला धडक दिल्याने गॅस गळती झाली. गॅसने पेट घेतल्याने टँकरचा स्फोट झाला. या स्फोटात टँकरचा चालक होरपळून ठार झाला तर कसाऱ्यातील एक युवक गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गाची वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती.
सकाळी सव्वासातच्या सुमारास चेंबूरहून सिन्नरकडे घरगुती वापराच्या गॅसची वाहतूक करणारा टँकर कसारा गावाजवळील एका वळणावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यावर अपघातग्रस्त झालेल्या कंटेनरवर आदळला. या अपघातात दोन्ही वाहने उलटी झाली. त्यामुळे टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली व अचानक टँकरने पेट घेतला. थोडय़ाच वेळात स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की टँकरच्या पुढील भागाचे अनेक तुकडे झाले. या स्फोटामुळे घाटात सर्वत्र हादरे बसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनीं दिली.
आगीत टँकरचा चालक विरेंद्र सिंग (३५ रा. मुंबई) हा होरपळून जागीच ठार झाला. कसारा येथील विनोद वाळवंटे (२५) हा युवक आपल्या चारचाकी वाहनाने महामार्गाकडे येत असताना आगीचा लोळ वाहनावर आल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास नाशिक येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास दुतर्फा ठप्प झाली. घोटी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. सुरक्षितेच्या दृष्टिने दुतर्फा एक किलोमीटर अंतरावर वाहने थांबविण्यात आली होती. कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.