कोल्हापूर शहरात रात्रीच्यावेळी दगडाने ठेचून खून करण्याचा प्रकार सुरूच असून, बुधवारी एका महिलेचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. लक्ष्मीपुरी परिसरातील रिलायन्स मॉलजवळ एका महिलेचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळला. या महिलेचाही दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. अशा पद्धतीने खून झाल्याची गेल्या चार महिन्यांतील ही दहावी घटना आहे. 
खुनाच्या या प्रकारामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यावर किंवा खुल्या ठिकाणी झोपणाऱया नागरिकांमध्ये ‘सिरियल किलर’मुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्वाधिक खून हे रेल्वेस्थानक परिसरात झाले आहेत. गेल्याच शनिवारी रेल्वेस्थानक परिसरात एका पुरुषाचा याच पद्धतीने खून करण्यात आला होता.
रेल्वे स्थानकासमोरील पोस्ट ऑफिस ते शाहूपुरी पोलीस ठाणे या परिसरात खून होण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसांत वाढ होत चालली आहे. सुरुवातीला खून होऊनसुद्धा पोलिसांनी त्याची नोंद बेवारस व्यक्तीचा मृत्यू अशा स्वरूपात केली होती. प्रजासत्ताक संघटनेने हा बेवारसांचा मृत्यू नव्हे; तर खुनाचा प्रकार आहे, असे मत व्यक्त केले होते. त्याची दखल घेऊन नंतर पोलिसांनी बेवारस मृत्यू ऐवजी खून अशी नोंद करण्यास सुरुवात केली.