माजी आमदार लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध शनिवारी आणखी एका महिलेने लैंगिक छळाची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यामुळे मानेंविरोधातील तक्रारदार महिलांची संख्या सहा झाली आहे. पोलिसांनी या तक्रारीनुसार मानेंविरुद्ध आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून बलात्काराचे गुन्हे दाखल होऊन दोन आठवडे उलटूनही माने पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत.
शनिवारी तक्रार दाखल करणारी महिला माने यांच्या संस्थेत २००५ पर्यंत काम करत होती. त्या काळात माने यांनी आपला लैंगिक छळ केल्याचे तिने या तक्रारीत म्हटले आहे.  
दरम्यान बलात्काराचे गुन्हे दाखल होऊन दोन आठवडे उलटले तरी माने यांचा शोध लागत नसल्याबद्दल पोलिसांनी काहीही बोलण्यास नकार देत मौन बाळगणे पसंत केले आहे. यामुळे लक्ष्मण मानेप्रकरणी जनतेच्या मनातील संशय आणखी बळावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासासाठी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ मागून घेतली आहे.
दुसरीकडे माने यांच्यावर कारवाई करण्याच्या मागण्यांचे सत्र सुरूच असून आज मनसेने याप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे. माने यांच्या संस्थेतून आजवर नोकरी सोडून गेलेल्या सगळय़ांना बोलावून त्यांच्याकडेही चौकशीची पक्षाने मागणी केली आहे.