शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी राजकीय मतभेद असलेल्यांची संख्या जशी प्रचंड तशी त्यापलीकडे जाऊन त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या अमर्याद. त्याचा प्रत्यय वारंवार येत असून बाळासाहेबांच्या नावाने उद्याननिर्मितीच्या निमित्ताने रेसकोर्सच्या जागेवरून सुरू झालेल्या वादावर अद्याप अंतिम तोडगा निघाला नसताना आंतरराष्ट्रीय वास्तुविशारद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्तीने बाळासाहेबांच्या नावाने हे स्मृती उद्यान कसे असावे, याचा प्राथमिक आराखडाच तयार केला आहे.

बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व, सर्वसामान्यांसाठी केलेले कार्य आणि वादळी राजकीय जीवन यामुळे अनेकांना त्यांच्याविषयी प्रचंड आकर्षण असून या आकर्षणाप्रमाणेच त्यांचे स्मृती उद्यानही आकर्षित होणे आवश्यक असल्याची बहुतेकांची भावना आहे. या भावनेपोटीच राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील दिवंगत आमदार डॉ. वसंत पवार यांची कन्या अमृता पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्मृती उद्यानाचा एक प्राथमिक स्वरूपाचा आराखडा तयार केला आहे. अमृता पवार यांनी आतापर्यंत केवळ भारतातच नव्हे तर, विदेशातही आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे धर्मगुरूच्या स्मृतीनिमित्त उभारण्यात आलेला प्रकल्प असो किंवा तुळजापूर, शिर्डी यांसारख्या तीर्थस्थळांसाठी करण्यात आलेले काम असो, त्यात त्यांचा सहभाग राहिला आहे. कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता आमच्या भावनांचा विचार करून या प्रयत्नांकडे बघितले गेले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले आहे. माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्वरित संपर्क साधून आम्हाला सांत्वना देणारे जे मोजके नेते होते त्यात बाळासाहेबांचा समावेश होता. त्यामुळेच रेसकोर्सवर त्यांच्या नावाने उद्यान उभारण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यावर या महान नेत्याचे स्मृती उद्यान कसे एकमेवाद्वितीय राहू शकेल, यादृष्टीने विचार घोळू लागले आणि सहकाऱ्यांच्या साथीने आराखडा तयार होऊ लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

रेसकोर्सवरील या स्मृती उद्यानासाठी अमृता पवार यांनी डॉ. ई. मोझेस मार्गाकडून मुख्य प्रवेशद्वारासह एकूण आठ द्वार प्रस्तावित केले आहेत. व्यंगचित्रांच्या तसेच संपादकीयाच्या माध्यमातून मांडलेले विचार, शिवाजी महाराजांविषयी असलेला आदर आणि त्यांच्या राज्य कारभाराची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेले प्रयत्न, रोखठोक व पारदर्शी विचार, निसर्ग व हिंदू संस्कृतीविषयी असलेले प्रेम या सर्वाचा मिलाफ या स्मृती उद्यानात वेगवेगळ्या माध्यमांतून कसा होईल, याकडे आराखडय़ात विशेष लक्ष देण्यात आले आहे. एका उंचीवर महाराष्ट्राचा आकार दर्शविण्यात आला आहे. व्यंगचित्र साप्ताहिकाच्या माध्यमातून मराठी मनांना चेतविणाऱ्या बाळासाहेबांच्या विचारांचे दर्शन प्रवेद्वारापासूनच होण्यासाठी शिल्प स्वरूपात कागदांचा वापर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. सर्वत्र हिरवाई, एकीकडे बाळासाहेबांशी संबंधित वस्तूंचे संग्रहालय, ग्रंथालय, त्यांच्या आवाजातील भाषणे किंवा त्यांच्याविषयी व्यक्त करण्यात आलेली मते यांचे पडद्यावरून दर्शन, सिंहासनावर बसलेले बाळासाहेब आणि सिंहासनामागे त्यांच्या पारदर्शी स्वभावाचे दर्शन घडविणारी सुमारे ५० मीटरची काच आणि त्यावर भगवा प्रकाशझोत, असे सर्व काही या आराखडय़ात दर्शविण्यात आले आहे. स्मृती उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक लेझर प्रणालीचा वापर करण्याचेही सूचित करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.