पाहणीसाठी विरोधी पक्ष नेत्यांचा दौरा

औरंगाबाद : मराठवाडय़ातील अतिवृष्टीने २५ लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्यात सडत असून हजाराहून अधिक पूल वाहून गेले आहेत. तर सुमारे चार हजार अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. अनेक पाझर तलाव आणि पाणीपुरवठय़ाचे तलाव फुटल्याने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्नही आ वासून उभे  ठाकतील असे दिसून येत आहे. नुकसानीचे अंदाज आणि विस्तृत माहिती काढली जात असतानाच दिवसभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पुन्हा पाऊस झाला. दरम्यान  जायकवाडीतून होणारा विसर्ग शुक्रवारी २८ हजार २९६  क्युसेक वेगाने सुरू होता. त्यामुळे बीड जिल्ह्यातील पूर स्थिती कायम आहे. नांदेडमध्ये मात्र पूरस्थिती नियंत्रणात असून सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोयाबीन, ऊस, कापूस पिकांचे अधिक नुकसान झाले असून  मदतीसाठी १७९६ कोटी रुपये लागू शकतात असा विभागीय प्रशासनाचा अंदाज आहे. वाहून गेलेल्या पुलांची संख्या १०७७ पूल पडले असून त्यासाठी मोठी रक्कम लागणार आहे. अतिवृष्टीमुळे अंतर्गत रस्त्यांची चाळणी झाली असून त्यासाठी ३४१ कोटी रुपये लागू शकतील. ७१ जिल्हा परिषदेच्या शाळांना हानी पोहोचली असून २०५ फुटले आहेत. महावितरणच्या पायाभूत सुविधांचेही मोठे  नुकसान झाले आहे. त्यासाठी स्वतंत्र निधी लागणार आहे. तसा अंदाजही अधिकाऱ्यांनी दिला असला तरी हानी विषयक माहिती अजूनही गोळा केली जात आहे. मराठवाडय़ातील सर्व मोठी धरणे आता शंभर टक्के भरली आहेत. पूर नियंत्रणासाठी विसर्ग कमीजास्त करताना नदीपात्राबाहेर पाणी जाऊ नये असे प्रयत्न केले जात आहे. केवळ जायकवाडीच नाही अन्य धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. बीड जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे.