सातपूर औद्योगिक वसाहतीतील नासर्डी नदीलगत नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी अनधिकृतरीत्या उभारलेले संपर्क कार्यालय पाडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या बाबतची माहिती याचिकाकर्ते व फ्रावशी अ‍ॅकॅडमीचे संस्थापक रतन लथ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
औद्योगिक वसाहतीच्या परिसरात अनधिकृतपणे उभारलेले हे बांधकाम हटवावे, या मागणीसाठी लथ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नासर्डी नदीलगत सातपूर येथे लोंढे यांनी संपर्क व पक्ष कार्यालय उभारले आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार लथ यांनी आधी महापालिकेकडे केली होती. परंतु, पालिकेने त्याची दखल घेतली नाही. यामुळे त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या प्रकरणाची सुनावणी न्या. ए. एम. खानविलकर आणि के. के. तातेड यांच्या खंडपीठापुढे झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने संबंधित अनधिकृत बांधकाम पाडण्याचे निर्देश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहेत. तसेच हे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास आवश्यक ती मदत पुरवावी, असेही आदेशात म्हटले आहे. या आदेशाची प्रत पोलीस आयुक्तांनाही पाठविण्यात आली असून अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आवश्यक ते पोलीस बळ उपलब्ध करण्याचेही सांगण्यात आले आहे.
याच पद्धतीने औद्योगिक वसाहतीत जी जी अनधिकृत बांधकामे असतील, त्यांच्यावरही याच निर्णयाच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. लथ यांच्या वतीने अ‍ॅड. तुषार सोनवणे यांनी काम पाहिले.