जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या कामासाठी अतिरिक्त निधी देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केले असल्याची माहिती आ. साहेबराव पाटील यांनी दिली. मुंबई येथे विधान भवनातील विधानसभा कामकाज सल्लागार समिती कक्षात सोमवारी दुपारी अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांसह साहेबराव पाटील, संजय सावकारे हे आमदार तसेच जलसंपदाचे मुख्य सचिव एकनाथ पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते. २०१३-१४च्या कामातील भौतिक व आर्थिक नियोजनानुसार सांडवा १३६ ते १३९.२४ मीटरपर्यत उंच करणे, अमळनेर शहरासह परिसरातील १०-१२ गावांना पिण्यासाठी पाणी व शेती सिंचनासाठी जलसाठा निर्माण होण्याकरिता प्रकल्पाची उंची १३६ ते १३९.४० मीटपर्यंत (सांडवा व प्रस्तंभ १४५ मीटपर्यंत) करावी, प्रकल्पाचे दरवाजे व प्रस्तंभाचा सुधारित आराखडा तयार करण्यासाठी नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेचे महासंचालक व जलसंपदाचे मुख्य सचिव यांना निर्देश देण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले.
याशिवाय प्रकल्प कामास लागणारा अतिरिक्त निधी देण्याचेही तत्त्वत: मान्य करण्यात आले असून दोंडाईचा येथील औष्णिक विद्युत केंद्र टप्पा-१ आणि टप्पा-२ यासाठी एकूण ८५ दशलक्ष घनमीटर पाण्याच्या मागणीतून महाजनकोकडून भाग भांडवली हिस्सा व आगाऊ पाणीपट्टी रुपये ७१६ कोटी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आले.