उस्मानाबाद शहर व परिसरात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हजेरी लावली. तासाहून जास्त वेळ झालेल्या अवकाळी पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी साचले. ग्रामीण भागात खरीप पेरणीपूर्वीची कामे या पावसामुळे खोळंबली आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी अवकाळी पावसामुळे वीज पडून जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला.
शहरात दिवसभर असह्य़ उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले व लागलीच जोराच्या पावसाला सुरुवात झाली. वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. सुमारे तासापेक्षा जास्त वेळ जोरदार पाऊस बरसला. शहरातील सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. बऱ्याच ठिकाणी गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर अडून राहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. वाऱ्याच्या वेगामुळे छोटी-मोठी झाडे पडली.
जिल्ह्य़ात दोघांचा बळी
बुधवारी दुपारी साडेतीन वाजताही जिल्ह्यात अनेक तालुक्यांना अवकाळीने तडाखा दिला. उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.) येथे शेतात काम करीत असलेला प्रशांत उत्तम वाडकर (वय २२) हा तरुण अंगावर वीज पडून जागीच ठार झाला. तुळजापूर शहरातील पुजारी मंडळासमोर पावसात दुचाकी घसरून राहुल रावसाहेब ताटे (बसवंतवाडी, तालुका तुळजापूर) हा युवक रस्त्यावर पडला. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या मालमोटारीने उडविल्याने तो जागीच ठार झाला. परंडा तालुक्यातील सोनारी, शिराळा व अनाळा येथील ३५ ते ४० झाडे वादळी वाऱ्यामध्ये रस्त्यावर पडली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक खोळंबली होती.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jun 2014 रोजी प्रकाशित
दुसऱ्या दिवशीही अवकाळीने झोडपले
उस्मानाबाद शहर व परिसरात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हजेरी लावली. तासाहून जास्त वेळ झालेल्या अवकाळी पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी साचले. ग्रामीण भागात खरीप पेरणीपूर्वीची कामे या पावसामुळे खोळंबली आहेत.
First published on: 06-06-2014 at 01:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Osmanabad rain