निर्मळ पाणी, प्रदूषण, औद्योगिक, सामाजिक विकास, शिक्षण, आरोग्य, रस्ते व सिंचन या सर्वच आघाडय़ांवर राज्य सरकार नापास झाले आहे. मंत्री, पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदार व अधिकारी विकासकामांत अपयशी ठरले असून या नापास सरकारमधील मीसुद्धा नापास मंत्री आहे, अशी खंत व्यक्त करत पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सरकारला ‘घरचा आहेर’ दिला.  
 राज्यात आघाडी सरकारने तीन वष्रे पूर्ण केली असली तरी या कालावधीत पाहिजे तशी विकासकामे झालेली नाहीत. त्याचाच परिणाम दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देशातील तेरा जिल्ह्य़ांतील १४१ तालुक्यांतील सात हजार गावांमध्ये प्रचंड दुष्काळ पडला, अशी माहिती राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समितीच्या माध्यमातून समोर आली असल्याचे ढोबळे यांनी रविवारी चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. अशा स्थितीत सर्वानी याकडे लक्ष देणे गरजेचे असताना सर्वाचेच दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळेच मी नापास मंत्री असून माझ्यासह सरकार, मंत्री व आमदार नापास झाले आहेत, असेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी राजकारण, समाजकारण, साहित्य, उद्योग, पर्यावरण व प्रदूषण अशा चौफेर विषयांना हात लावत सर्व आघाडय़ांवर मंत्री म्हणून स्वत: व सरकार कसे नापास झाले, याचा पाढा वाचून दाखवला.
तसेच पत्रकारांनी सरकारविरोधात आंदोलन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विकासाच्या मुद्दय़ावर काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष राजकारण करण्यात गुंतलेले असल्याचा आरोपही त्यांनी केला.