परकीय नोटांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या परराज्यातील १३ जणांच्या टोळीस पकडण्यात रविवारी पोलिसांना यश आले. शहरात अनेक दिवसांपासून परकीय चलन दाखवून भारतीय चलन घेणारी परराज्यातील टोळी सक्रिय असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी रचलेला सापळा यशस्वी झाला.
गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप दिवाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन व त्यांच्या पथकाने शहरात वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये कार्यरत राहून या टोळीची माहिती घेण्यास सुरुवात केली. निरीक्षक महाजन यांनी स्वत: व्यापारी बनून साडेपाच लाख रुपयांच्या भारतीय चलनाच्या बदल्यात १० लाखांचे अमेरिकन चलन हवे असल्याचे टोळीतील प्रमुखास कळविले. पैसे देण्याच्या व डॉलर घेण्याच्या बहाण्याने पोलिसांनी त्यास द्वारका भागात बोलविले. संशयित महाजन यांना एकटय़ालाच गल्लीबोळात घेऊन गेला. पैसे आणले काय, असा सवाल त्याने केल्यावर महाजन यांनी भारतीय चलन दाखविले. त्यानेही डॉलर दाखविले. महाजन यांनी लगेच सांकेतिक इशारा केल्यावर व्यवहार करण्यासाठी आलेले इतर दोन जण पळून जाऊ लागले. त्यांना साहाय्यक निरीक्षक खरेंद्र टेंभेकर, नाईक दिलीप ढुमणे, संजीव जाधव, रंजन बेंडाळे, गणेश भामरे, आदींनी पकडले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी आपले नाव जमाल आणि नुरू असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून रुमालामध्ये बांधलेले कागदाचे बंडल ताब्यात घेण्यात आले. या बंडलमध्ये वरून सात ते आठ अमेरिकन डॉलर मिळून आले. आपण मूळचे पश्चिम बंगाल व बिहारमधील रहिवासी असून सध्या नाशिकजवळील गंगापूर गावात राहत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी गंगापूरमध्ये तपास मोहीम राबवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या काहींना नदीकाठी व जलालपूर गावात पकडले. त्यात चार महिला व सात पुरुषांचा समावेश आहे.