मराठी साहित्य आणि रंगभूमीवरील बहुआयामी व्यक्तिमत्त्व कै. पु. ल. देशपांडे यांच्या योगदानाच्या स्मृती जागवणारा ‘पुलोत्सव’ हा बहुरंगी कार्यक्रम येत्या ७ डिसेंबरपासून येथे सुरू होणार असून, यंदा त्यामध्ये बुजुर्ग रंगकर्मी विजया मेहता यांना ‘पुलोत्सव सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
आर्ट सर्कल, रत्नागिरी आणि ‘आशय’ सांस्कृतिक-पुणे यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित या पाचव्या महोत्सवाबाबत ‘आशय सांस्कृतिक’चे वीरेंद्र चित्राव आणि आर्ट सर्कलचे अध्यक्ष अनिल पाध्ये व नितीन कानविंदे यांनी माहिती दिली. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी ते ‘साद दे हृदया’ हा संगीतमय गप्पांचा कार्यक्रम करणार आहेत. तसेच काही गायक कलाकार दवणे यांची गीते सादर करणार आहेत.
‘पुलोत्सव’कडे तरुण वर्ग आकर्षित व्हावा, अशी इच्छा कै. सुनीताबाईंनी व्यक्त केली होती, म्हणून या महोत्सवात ‘पुलोत्सव तरुणाई’ पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी प्रसिद्ध गायिका बेला शेंडय़े यांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच ‘बेला के फूल’ या कार्यक्रमाद्वारे शेंडय़े त्यांचा संगीत प्रवास उलगडणार आहेत.
यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या बुजुर्ग रंगकर्मी विजया मेहता यांना महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी, ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ‘पुलोत्सव सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी विजयाबाईंची प्रकट मुलाखत प्रसिद्ध नाटय़ दिग्दर्शक विजय केंकरे आणि अजित भुरे घेणार आहेत. त्याचप्रमाणे विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांच्या दुर्मीळ चित्रफिती प्रदर्शित करण्याचा कार्यक्रम त्याच दिवशी सकाळी १० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेटय़े सभागृहात दाखविण्यात येणार आहेत.
पुलंच्या साहित्यिक-सांस्कृतिक योगदानाबरोबरच विविध सामाजिक संस्था-उपक्रमांना त्यांनी सढळ हाताने मूकपणे केलेले साहाय्य, ही पुल-सुनीताबाई दाम्पत्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्राला आहे, म्हणूनच या महोत्सवात पुलंच्या नावाने ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देण्याचा उपक्रम रत्नागिरीच्या ‘पुलोत्सव’मध्ये प्रथम सुरू झाला आणि नंतर त्याचे अनुकरण राज्यभरातील ‘पुलोत्सव’ कार्यक्रमांमध्ये झाले. यंदाही हा पुरस्कार महोत्सवाच्या पहिल्या दिवशी देण्यात येणार आहे, मात्र पुरस्कारार्थी व्यक्तीचे नाव नंतर जाहीर केले जाणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.