पालघरमध्ये जमावानं तीन साधूंवर हल्ला करत हत्या केली. या घटनेवर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या घटनेला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न सोशल माध्यमातून झाला. याला राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट उत्तर दिलं आहे. साधूंची हत्या केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची यादीच प्रसिद्ध केली आहे.

पालघरमध्ये तीन साधूंची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करत घटनेवर भाष्य केलं होतं. अफवा आणि गैरसमजातून ही घटना घडली आहे. हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही यासंदर्भात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली होती. मात्र, या घटनेला धार्मिक रंग देण्याच्या चर्चा थांबत नसल्यानं सरकारनं आरोपींची नावं जाहीर केली आहेत. गृहमंत्री देशमुख यांनी एक ट्विट करून ही यादी प्रसिद्ध केली आहे. “पालघर येथील घटनेत अटक झालेल्या १०१ जणांची यादी इथे सार्वजनिक करण्यात येत आहे. जी विघ्न संतोषी मंडळी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा सातत्यानं प्रयत्न करत होती, त्यांनी नक्की पहावी,” असं म्हणत देशमुख यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा- पालघर हत्याकांड : आरोपींचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून तीन साधूंची जमावानं हत्या केली होती. गुरुवारी रात्री डहाणू तालुक्यातील गडचिंचले परिसरात दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाला गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात चोर फिरत असल्याच्या अफवा पसरली होती. त्यातून ही घटना घडल्याचं चौकशीतून समोर आलं होतं.