बेकायदा वृक्षतोडीचे प्रकरण मिटविण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणारा महापालिकेचा कनिष्ठ अभियंता महेश गांगुर्डे यास गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित कनिष्ठ अभियंत्यास अटक करण्यात आली आहे. कॅम्प भागातील एका घरमालकाने वडिलोपार्जित मालमत्तेतील कडुनिंबाचे वृक्ष बेकायदेशीररीत्या तोडल्याची तक्रार डिसेंबरमध्ये महापालिकेकडे प्राप्त झाली होती. हे प्रकरण प्रभाग एकमध्ये चौकशीसाठी गेल्यावर संबंधित घरमालकास नोटीस देण्यात आली. या नोटिशीला उत्तर देण्यात आल्यावर इमारत निरीक्षक तथा कनिष्ठ अभियंता महेश गांगुर्डे याने बेकायदा वृक्षतोडीचा पंचनामा बदलून प्रकरण मिटवून टाकण्याची हमी देत घरमालकाच्या नातेवाईकाकडे चार हजार रुपये मागितले. त्या नातेवाईकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर पालिकेच्या प्रभाग एकमधील कार्यालयात सापळा रचण्यात आला. गुरुवारी चार हजारांची रक्कम स्वीकारताना गांगुर्डे हा या सापळ्यात अलगद अडकला. छावणी पोलीस ठाण्यात गांगुर्डे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.